News Flash

राज्यभरातील एसटीच्या २५२ बस आगारात सीसीटीव्ही!

सध्या राज्यभरातील एसटीची एकूण ५८८ बस स्थानके, २५२ बस आगार आहेत.

 

अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत प्रवासी सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी एसटी बस आगारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यामुळे प्रवासी सुरक्षेसह आगारांतील साफसफाई आणि शिस्त मोडणाऱ्यांवरही नजर ठेवली जाणार आहे. सुरुवातीला काही आगारांत प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा बसवण्यात येणार असून काही महिन्यांत याबाबतची निविदा प्रक्रिया काढण्यात येणार आहे. यामुळे येत्या काळात एसटी आगारांची सुरक्षा अधिक मजबूत होणार असल्याचा दावा एसटीचे अधिकारी करत आहेत.

सध्या राज्यभरातील एसटीची एकूण ५८८ बस स्थानके, २५२ बस आगार आहेत. यातून रोज १८ हजारांहून अधिक बस गाडय़ा चालवल्या जात असून या गाडय़ांनी रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे ७० लाखांच्या घरात आहे. मात्र असे असतानाही एसटी आगारात सुरक्षेच्या दृष्टीने ठोस सुरक्षा यंत्रणा नसल्याने सीसीटीव्ही बसवण्याचा विचार सुरू झाला आहे.

रात्रीच्या वेळी एसटी बस गाडय़ांनी प्रवास करताना गाडी चुकल्यास एकटय़ादुकटय़ा महिला प्रवाशांना आगारात असुरक्षित वाटू नये, यासाठी राज्यभरातील सर्व आगारांत सीसीटीव्ही बसवण्यात येणार असल्याचे एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या काही उपाययोजनांचा प्रामुख्याने विचार केला जात आहे. याच धर्तीवर राज्यभरातील एसटी बस आगारात सीसीटीव्ही बसवण्याचा विचार आहे. याबाबतची चर्चा पूर्ण झाली असून येत्या काही दिवसांत निविदा प्रक्रिया काढण्यात येतील, परंतु सध्या ही प्रक्रिया प्राथमिक स्तरावर आहे.

– दिवाकर रावते, राज्य परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2016 3:33 am

Web Title: cctv in maharashtra state transport bus depot
टॅग : Cctv
Next Stories
1 पालघर विकासाची जबाबदारी सिडकोवर
2 राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या नामांतरास काँग्रेसचा विरोध
3 दूषित बर्फास कारण..
Just Now!
X