जयेश शिरसाट, मुंबई

दहिसरमधील महिलेच्या तक्रारीनंतर कॅमेऱ्यांबाबत नवा पेच; खासगी ठिकाणच्या वापराबाबतच्या नियमांकडे दुर्लक्ष

सध्याच्या घडीला सुरक्षेसाठीच्या उपायांपैकी महत्त्वाचे साधन समजले जाणारे ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे आता नागरिकांच्या खासगीपणाला बाधा ठरू लागत असल्याचा नवा पेच नुकताच समोर आला आहे. ‘शेजाऱ्याने घराबाहेर बसवलेल्या सुरक्षा कॅमेऱ्यांमुळे आपल्या घरातील प्रत्येक हालचाल टिपली जाते,’ अशी तक्रार घेऊन आलेल्या दहिसरमधील एका महिलेला पोलिसांनी ‘तुम्ही दारे, पडदे लावून बसा’ असे उत्तर देत पिटाळून लावले. मात्र खासगी ठिकाणी बसवण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत अन्यत्रही असा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे पुरेशी स्पष्ट असतानाही या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे.

शेजाऱ्याने लावलेल्या दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी घरातली प्रत्येक हालचाल दिसते, त्यामुळे तुम्ही याबाबत कारवाई करा, अशी तक्रार दहिसर गावठाण येथील भालचंद्र कोळी चाळीत राहणाऱ्या विजया बारी (६०) यांनी एमएचबी पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी आपल्या घरी येऊन प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करावी, अशी विनंतीही त्यांनी केली. मात्र एमएचबी पोलिसांनी त्यांची ही तक्रार हास्यास्पद ठरवत ‘तुम्ही खिडक्यांना पडदे लावून घ्या, दारे बंद ठेवा’ असा सल्ला त्यांना दिला.

बारी यांच्या तक्रारीनुसार त्यांच्यासमोर राहणाऱ्या आचार्य कुटुंबाने आपल्या घराबाहेर दोन सीसीटीव्ही बसवले आहेत. या सीसीटीव्हींचे तोंड बारी यांच्या घराच्या दिशेने आहे. त्यामुळे घरातली प्रत्येक हालचाल या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आचार्य पाहू शकतात, असे बारी यांचे म्हणणे आहे. बारी यांनी ९ एप्रिल रोजी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ३० मे रोजी त्यांच्या वसाहतीत जाऊन पाहणी केली. मात्र या वेळीदेखील अधिकाऱ्यांनी बारी कुटुंबालाच ‘शेजारधर्माचे पालन करा’ असा सल्ला दिला.

बारी यांच्या तक्रारीबाबत एमएचबी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ  निरीक्षक अशोक जाधव यांच्याशी संपर्क साधला असता या दोन कुटुंबांमध्ये पूर्ववैमनस्य आहे, त्यातून या तक्रारी पुढे येत आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. आचार्य कुटुंबातील श्रिजीत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

असाही गैरफायदा

एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने लोकसत्ताला दिलेल्या माहितीनुसार शहरात सीसीटीव्हींमुळे शेजाऱ्यांमधील वादाची काही प्रकरणे पोलीस ठाण्यांपर्यंत पोहोचली. एका उच्चभ्रू इमारतीत राहणाऱ्या व्यक्तीने स्वत:च्या घराबाहेर सीसीटीव्ही लावले. समोरचे घर, मधला व्हरांडय़ातील सर्व हालचाली या सीसीटीव्हीत कैद होत. हे प्रकरण पोलीस ठाण्यात आले. आपली तरुण मुलगी कधी बाहेर पडते, कधी घरी परतते यावर लक्ष ठेवण्यासाठी हे सीसीटीव्ही लावल्याचा आरोप तक्रारदार कुटुंबाने केला होता. या प्रकरणात सीसीटीव्ही बसविणाऱ्या व्यक्तीला स्पष्ट सूचना देण्यात आल्या. सीसीटीव्हीचे तोंड स्वत:च्या घराच्या दिशेने फिरवून घेण्यात आले. त्यानंतर वादावर पडदा पडला.

मार्गदर्शक तत्त्वे

  • घराबाहेर सीसीटीव्ही लावताना त्याचे तोंड किंवा दिशा समोरील घरांवर किंवा अन्य आस्थापनांवर असू नये. स्वत:च्या मालमत्तेच्या संरक्षणासाठीची ही उपाययोजना असल्याने आपले घर, मालमत्ता निगराणीखाली, तेथील हालचाली स्पष्ट दिसाव्यात या पद्धतीने सीसीटीव्हींची जागा, दिशा निश्चित करावी.
  • गृहनिर्माण संस्थांमध्ये सीसीटीव्हींचे जाळे उभारताना सर्व रहिवाशांच्या संमतीने जागा निश्चित कराव्यात.
  • सीसीटीव्हींची दिशा गृहनिर्माण सोसायटीच्या बाहेरील रस्त्यावर असेल तर तेथे ही जागा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहे, अशी सूचना लिहिणे बंधनकारक आहे.

पोलिसांनी खातरजमा करावी!

बारी यांच्या तक्रारीबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावण्यास काहीही हरकत नाही. मात्र या सीसीटीव्हींचे तोंड स्वत:च्या मालमत्तेच्या, घराच्या दिशेने असणे आवश्यक आहे. जर सीसीटीव्हींमुळे एखाद्याच्या वैयक्तिक, खासगी आयुष्यात ढवळाढवळ होत असेल आणि तशी तक्रार आल्यास स्थानिक पोलीस तक्रारीची खातरजमा करून सीसीटीव्हींची दिशा बदलण्याची सूचना संबंधित व्यक्तीला देऊ शकतात.’

खबरदारी आवश्यक

सायबरतज्ज्ञ अ‍ॅड. विकी शहा यांच्यानुसार सहकारी गृहनिर्माण संस्थांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्हींचे जाळे उभारता येते. मात्र सर्व रहिवाशांच्या संमतीने सीसीटीव्हींची जागा निश्चित केली जाते. जर एखादा सीसीटीव्ही एखाद्याच्या घरात डोकावत असेल तर ती खासगी आयुष्यात ढवळाढवळ ठरते. तसेच सीसीटीव्ही बसवलेल्या ठिकाणी लेखी सूचना असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.