प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटी महामंडळाकडून प्रस्ताव विचाराधीन

मुंबई उपनगरीय लोकल गाडय़ांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला असतानाच आता एसटी महामंडळाकडूनही बस गाडय़ांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा विचार केला जात आहे. एसटी महामंडळाला देशभरातील २४ राज्य परिवहन सेवांची शिखर संस्था असलेल्या एएसआरटीयूकडून (असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट) नुकतीच याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यांनतर बस गाडय़ांमध्ये सीसीटीव्ही बसविणे योग्य आहे की नाही यावर चर्चा केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

स्थानक आणि आगारांमध्ये सीसीटीव्हींचे काम पूर्ण झाल्यानंतरच बस गाडय़ांमध्ये कॅमेरे बसवण्याबाबत निर्णय घेतला जाईल. सध्या यावर प्राथमिक स्तरावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांना विचारले असता, एएसआरटीयूकडून देशभरातील सर्व राज्य परिवहन सेवांना सीसीटीव्हीबाबत विचारणा केली होती. यावर अजून निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. एसटीकडे आर्थिक तूटवडा असताना अतिरिक्त ३६ कोटींचा भार पेलवला जाणार आहे का नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

३६ कोटींचा खर्च अपेक्षित !

सध्या एसटी महामंडळाकडून बस स्थानक आणि आगारांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव असून ५६८ बस स्थानक आणि २५० आगारांमध्ये ते बसविण्यात येतील. यासाठी ३६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

पहिल्या टप्प्यात ५७ स्थानके

डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला आणि पुणे शहरातील स्वारगेट तसेच शिवाजीनगर स्थानकांवर सीसीटीव्ही लावले जातील. पहिल्या टप्प्यात ५७ स्थानकांत सीसीटीव्ही बसवले जातील.