समन्वय समितीचा निर्धार
मंडपांचा नकाशा सादर करू न शकलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी, आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर मंडप उभारण्यास परवानगी द्यावी, अन्यथा परवानगीशिवायच गणेशोत्सव दणक्यात साजरा करण्याचा निर्धार बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केला आहे.
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना मंडळांकडून महापालिकेकडे सादर झालेल्या १००९ अर्जावर निर्णय होऊ शकलेला नाही. १९११ पैकी फक्त ४८८ मंडळांनाच पालिकेकडून परवानगी देण्यात आली. तर १४४७ अर्ज पोलीस व वाहतूक पोलिसांकडे रखडले आहेत. पोलिसांनी ३७६ मंडळांना उत्सव साजरा करण्याची परवानगीच नाकारली आहे. ज्यांनी मंडपांचा नकाशा सादर केलेला नाही त्यांच्या अर्जालाही केराची टोपली दाखवण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर समन्वय समितीने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन नकाशांअभावी परवानगी नाकारण्यात आलेल्या मंडळांना पुन्हा एकदा संधी द्यावी व आवश्यक कागदपत्रे सादर होताच मंडप उभारण्यास परवानगी द्यावी, असे आवाहन करण्यात आले. मात्र, परवानगी मिळालीच नाही तरी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी व्यक्त केला आहे.
दुष्काळग्रस्तांना मदत
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दुष्काळग्रस्तांना मदत करावी असे आवाहन समितीने केले आहे. दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला जाईल, असेही समितीने सांगितले.
ध्वनिक्षेपक वापरमर्यादा वाढवण्याची मागणी
गणेशोत्सवादरम्यान मध्यरात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी मिळावी अशी मागणीही समितीतर्फे पुढे रेटण्यात आली आहे. गुजरातेत नवरात्रोत्सवात दहा दिवस ध्वनिक्षेपक मध्यरात्री १२ पर्यंत सुरू असतात, मुंबईत गणेशोत्सवादरम्यान किमान सहा दिवस तरी ध्वनिक्षेपक वापर मर्यादा वाढवावी असे समितीने म्हटले आहे.