गणेशाच्या आगमनासाठी राज्यभरात उत्साह, बाजारपेठा  फुलल्या; कोकणात अपवाद वगळता कोंडीचा त्रास कमी

रविवार सुट्टीचा दिवस राज्यभरात गणरंगात न्हाऊन निघाला. शनिवार संध्याकाळपासून राज्यातील सर्वच भागांमध्ये गणेश आगमनाचा उत्साह पसरला. शहरी भागांतील बाजारपेठा फुले, मिठाया आणि आरासखरेदीसाठी गर्दीने फुलल्या होत्या. कोकण गाठणाऱ्या मुंबईकरांना कोलाड ते इंदापूर वगळता कोंडीचा त्रास यंदा कमी जाणवला.

महामार्गावरील भरमसाट खड्डय़ांमुळे या वर्षी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात होती. यंदा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने महामार्गावर ठिकठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे. हे खड्डे कमी करण्याचा प्रयत्न अपुरा ठरला. त्यामुळे यावर्षी गणेशभक्तांचा प्रवास कसा होईल याबद्दल सारेच साशंक होते. मात्र रायगड जिल्हा प्रशासन व पोलिसांनी ठोस व आवश्यक त्या सर्व उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्याने गणेशभक्तांचा प्रवास सुखकर झाला. खड्डे बुजविण्याबरोबरच वाहतूक कोंडीचे प्रमुख ठिकाण असलेल्या पेण ते रामवाडीदरम्यान दुभाजक टाकण्यात आले असून रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतूक पोलीस तनात करण्यात आले होते. महामार्गावर तब्बल १६ ठिकाणी ५० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. त्याद्वारे वाहतुकीचे नियमन करण्यात येत होते. अपघातग्रस्त किंवा नादुरुस्त वाहने तातडीने बाजूला करण्यासाठी क्रेन्स तनात ठेवण्यात आले होते.

कोकणाकडे यंदा पहिल्यांदाच..

गणेशोत्सवाच्या दिवसात अवजड वाहनांना महामार्गावरून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या वर्षी प्रथमच पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीमचा वापर करण्यात आला होता. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना स्पीकरवरून वाहतुकीसंदर्भात माहिती दिली जात होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पर्यायी मार्ग सुचविण्यात आले होते. या वर्षी कोंडीची भीती लक्षात घेऊन गणेशभक्तांनी मोठय़ा प्रमाणावर पर्यायी मार्गाचा वापर केला. या सर्व उपाययोजनांचा सुयोग्य परिणाम होऊन महामार्गावरील वाहतूक कोंडीचे विघ्न दूर झाले व गणेशभक्तांचा प्रवास सुखकर झाला. महामार्गावरील खड्डय़ांमुळे वाहनांचा वेग मंदावला असला तरी कुठेही प्रवासी अडकून पडले नाहीत.

सकाळच्या सुमारास पेण ते वडखळदरम्यान तर दुपारच्या सुमारास कोलाड ते इंदापूर आणि माणगाव बाजारपेठ परिसरातील काही काळ वाहतूक कोंडी झाली. मात्र वाहतुकीचे नियमन केल्याने ही वाहतूक कोंडी सुटली.

प्राणप्रतिष्ठापना मुहूर्त

गणरायाची विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी पहाटे साडेचारच्या ब्राह्म मुहूर्तापासून ते दुपारी दीडपर्यंत उत्तम मुहूर्त आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला (५ सप्टेंबर) कुलाचाराप्रमाणे कुलदैवतांची पूजा करून पहाटे साडेचारच्या ब्राह्म मुहूर्तापासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत श्रींची प्रतिष्ठापना करावी.  चतुर्थीच्या दिवशी सकाळी आठपर्यंत भद्रा करण आहे. मात्र, हा काळ प्रतिष्ठापनेसाठी वज्र्य नाही, असे ‘दाते पंचागकर्ते’चे मोहन दाते यांनी सांगितले.

फुलांचे दर चढेच

मुंबई : यंदा चांगल्या पावसामुळे फुलांची भरघोस आवक झाली असली तरी गणेशोत्सवाचे निमित्त साधत किरकोळ व्यापाऱ्यांनी फुलांचे दर चढेच ठेवले आहेत. दादर येथील फूल बाजारात सगळ्याच प्रकारची फुले शनिवारप्रमाणेच गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला महागातच विकली जात होती. रविवारी झेंडूची फुले ११० रूपये किलो तर सजावटीसाठी वापरण्यात येणारी ऑर्किडच्या केवळ चार फुलांसाठी भाविकांना १८० रूपये मोजावे लागत होते. तरीही, मात्र दादरमध्ये भाविकांनी फुलांसह अन्य सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.