गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात राज्यभरात लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यात आबालवृद्ध दंग झाले आहेत. सोमवारी सकाळपासूनच अवघ्या महाराष्ट्रात बाप्पांचा जयघोष, ढोल ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत उत्साहाने घरोघरी व सार्वजनिक मंडळात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत आहे. डोक्यावर भगव्या टोप्या घातलेले गणेश भक्त श्री गणरायाचा जयघोष करत आपल्या घराकडे मार्गक्रमण करताना दिसत आहेत. श्री गणेशाच्या आगमनामुळे अवघे महाराष्ट्र भक्तिमय झाले आहे. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, कोकण येथे गणेश भक्तांचा उत्साह दिसून येत आहे.
वर्षभर ज्या उत्सवाची वाट पाहिली जाते, त्या गणेशोत्सवाला सोमवारी प्रारंभ झाला. मुंबईतील चाकरमनी गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी म्हणजे कोकणात दाखल झाला आहे. हातात श्री गणेशाची मुर्ती घेऊन जल्लोष करत चिमुकले घरी जात असलेले चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. जागोजागी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मंडप उभारण्यात आले आहेत. अनेक शहरांमध्ये तरूणाई दुचाकीवरून गणेशाचा जयघोष करत फेरफटका मारताना दिसताहेत. काही गणेश मंडळांनी पहिल्या दिवसापासूनच देखावे सादर करण्याची तयारी केली आहे. यावर्षी बहुतांश महाराष्ट्रात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने यंदा जास्त उत्साह दिसून येतोय. महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, पंजाब, कर्नाटक आदी राज्यांमध्येही गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना उत्साहात करण्यात येत आहे.
मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात पहाटे पाच वाजता आरती करण्यात आली. या वेळी हजारो भाविकांची उपस्थित होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणेश आगमनानिमित्त पोलीस व प्रशासनाने नियोजन केले आहे.