हॅलो… हॅलो, मी बोलतेय…
मी…? कोण…? मी.
ऐका ना… मागे तुम्ही एक ब्लॉग लिहिला होता,
‘अस्वस्थ करून गेला दिलीप… ’ हो ना..?
तेव्हापासून तुम्हाला फोन करीन म्हणतेय.
आज धाडस झालं.
मी एक Actress आहे की Actor काय बोलतेय मी..? खरंतर मला मी Actress आहे सांगायला खूप लाज वाटते.. मी अजून पडद्यावर दिसले नाही ना!
आपल्याकडे पडद्यावर दिसल्याशिवाय Actor मानत नाही.
म्हणून मी मी आहे. खरंतर आता मीसुद्धा म्हणायला कसंतरी वाटतंय..
‘मी’ पण असं काहीच उरलं नाही
कित्ती बोलतेय मी..
ऐका ना..
पाच-सातच मिनिटं घेते..
एका मोठय़ा Acting school मधून मी अभिनयाचे धडे घेतले
Acting school संपल्यावर मुंबईच्या मायानगरीचे धडे घेतले, धडका घेतल्या कामं काही मिळाली नाहीत..
आई-वडिलांना सांगून आले होते मोठी नटी म्हणून परत येईन..
काहीच काम नाही म्हणून लग्न केलं.
शोधला एक मित्र, तोही तयार झाला.
आम्ही काही काही मुली काही जमलं नाही की लग्न करतो..
एक महत्त्वाचं काम होऊन जातं नं..
एक लाल टिळा मिरवता येतो.. आणि आता संसार करते असा गार्ड घेता येतो..
इतकं वाईट वाटतं ना तेव्हा..
फार दिवस नाही टिकलं लग्न..
तोही स्ट्रगलर. त्याचं स्ट्रगल बघण्याचं स्ट्रगल करणं महाकठीण होतं.
खटके उडाले काही.. वेगळी झाले.
पुन्हा एकदा आई-वडिलांपासून आधी, आता हा नवरा
‘अरे, डिवोर्स हो गया है यार उसका’
या अनुकंपा धर्तीवर थोडी थोडी कामं मिळू लागली.
डिवोर्स झालेली म्हणजे आयताच माल संधिसाधूची गर्दी वाढू लागली..
एक जण आवडला.. वयानं लहान होता..
पण जमलं.. लग्न केलं..
मला आधार मिळाला
‘शारीर’ या पलीकडं तिथं काहीच नव्हतं..
वयाचा ताळेबंद काही जमेना..
घट्ट नसलेली वीण उसवली,
पुन्हा एकटी पडले..
तुम्ही ऐकताय ना..?
हो.. हो.. बोला.. मी सुन्न..
तोवर एक जीव जन्म घेऊ पाहात होता..
दुसरा आधार शोधण्यापेक्षा त्यालाच वाढवावं.. की नको..? विचार करत होते.
यातच एक Live in वाला मित्र भेटला
समजून घेणारा..
लग्नापेक्षा हे बरं वाटलं. मला अधिकार आहे खरं असं बोलण्याचा. —————–
बरीच वर्षे झाली आहे या नवीन पार्टनरसह
करते अॅडजस्ट
पण, असते एकटीच मी..
आता ४५ वर्षांची आहे..
आईची सुद्धा भूमिका देत नाही कुणी..
हल्ली आयासुद्धा तरुण हव्यात सगळय़ांना..
वास्तव कसं का असेना सिनेमा टीव्हीत ते चकचकीतच दिसलं पाहिजे..
दोन-तीन नवरे केले, पण सगळे ‘पुरुष’च
‘मी’ असलेले त्यांच्यात मी स्वत:ला आणखी किती किती विरघळवणार..?
आता मी उरलेलीच नाही..
माझ्या मुलीला खेळवणारी ऑनररी आया
दारू प्यावीशी वाटते खूप कधीकधी
आरडाओरडा करावासा वाटतो..
पण वाटतंच फक्त..
दारावरची बेल वाजतेय हो.. पार्ट‘नर’ आला वाटतं. करते नंतर
उगाच संशय घ्यायचा..

ता. क..
हॅलो, मीच बोलतेय..
एक मुलगी आहे मला
ती पण Actress व्हायचं म्हणतेय हो..
(फोन कट..)

– मिलिंद शिंदे