मधुमेहाच्या त्रासावर पेशीच्या उपचार पद्धतीचा अर्थात ‘सेल थेरपी’चा वापर भारतात वाढत आहे. मधुमेहपीडित व्यक्तीच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी प्रति दिवशी ४ ते ५ इन्शुलिनचे इंजेक्शन द्यावे लागते. हा रोजचा त्रास सेल थेरपीने टाळता येतो असा तज्ज्ञांचा दावा आहे.
या उपचार पद्धतीमध्ये शरीरातील काही पेशी शरीराबाहेर काढल्या जातात व त्यांच्यावर प्रक्रिया करून पुन्हा शरीरात सोडल्या जातात. त्यानंतर रुणाला फक्त आहार नियंत्रित ठेवून निरोगी राहता येते. परदेशामध्ये या पद्धतीचा अवलंब मोठय़ा प्रमाणात केला जात असून भारतामध्ये ही उपचार पद्धती हळूहळू लोकांपर्यंत पोहोचत आहे.
भारतात मधुमेह या आजाराचे प्रमाण वाढले असून सुमारे ६५ लाख रुग्णांना मधुमेहाची लागण झाली आहे. तर मुंबईत हे प्रमाण ५६ टक्के आहे. मधुमेहासारख्या गंभीर आजाराकडे दुर्लक्ष केल्यास किडनी काम न करणे, दृष्टी जाणे या प्रकारचे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे मधुमेहावर वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. तरुणांचा बदललेला आहार, व्यायामाचा अभाव, अपुरी शारीरिक हालचाल, दारू आणि फास्ट फूडचे अतिसेवन अशा अनेक कारणांमुळे मधुमेह व त्यासारख्या अनेक गंभीर आजारांचे कारण आहे. त्यामुळे सेल थेरपीनंतरही आहार नियंत्रित ठेवणे अतिशय गरजेचे आहे.
‘स्टेमआरएक्स बायोसायन्स सोल्युशन सेंटर’चे संचालक प्रदीप महाजन यांनी सेल थेरपी उपचार पद्धतीद्वारा जगभरातील ५० रुग्णांवर यथस्वी उपचार केले आहेत. सध्या मुंबईत ही उपचार पद्धत सेव्हन हिल्स रुग्णालयात चाचणी पातळीवर सुरू करण्यात आली आहे. काही महिन्यांनंतर ही उपचार पद्धत महानगरपालिकेच्या रुग्णालयात सुरू केली जाईल. मधुमेहाचा रुग्ण कुठल्या टप्प्यावर आहे यानुसार ही उपचार पद्धती किती खर्चीक असेल हे ठरवले जाईल. या सेल थेरपीचा वापर सौंदर्यक्षेत्रातील उपचार पद्धतीतही केला जाऊ शकतो.
‘शुगर फ्री’ म्हणजे दिशाभूलच
साखरेचे अतिसेवन शरीराला घातक असल्यामुळे साखरेला पर्याय म्हणुन ‘शुगर फ्री’ नावाची पर्यायी साखर जाहिरातीद्वारे आपल्यापर्यंत पोहोचत असते. पण खरे पाहता अशी साखर उपायकारक नसून अशा उत्पादनातून ग्राहकांची दिशाभूल केली जाते असे मत डॉ. प्रदीप महाजन यांनी दिले.