17 July 2019

News Flash

‘नेरळ-माथेरान रेल्वेच्या रुळांखाली सिमेंटचे स्लीपर बसवा’

हा बदल केल्यास गाडीला धक्के बसणार नाहीत आणि वळणाच्या मार्गावरील टप्पाही मिनी ट्रेन व्यवस्थित पार पाडू शकेल.

(संग्रहित छायाचित्र)

‘आरडीएसओ’कडून मध्य रेल्वेला दिलेल्या सुरक्षितता अहवाल सादर

‘नेरळ-माथेरान मिनी ट्रेन’ मार्गावरील लोखंडी ‘स्लीपर’ काढून त्याजागी सिमेंटचे ‘स्लीपर’ बसविण्याची सूचना ‘रिसर्च स्टॅण्डर्ड अ‍ॅण्ड डिझाइन ऑर्गनायझेशन’ने (आरडीएसओ) मध्य रेल्वेला दिलेल्या सुरक्षितता अहवालात केली आहे.

२१ ऑक्टोबर २०१८ आणि त्यानंतर ९, २० आणि २१ डिसेंबर रोजी मिनी ट्रेनचे डबे रुळावरून घसरल्याच्या घटना घडल्या होत्या. सलग घडलेल्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता.

सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे मध्य रेल्वेने आरडीएसओला मार्गाची पाहणी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार आरडीएसओने रूळ, डबे आणि इंजिनची पाहणी केली. या पाहणीनंतर आरडीएसओने सादर केलेल्या अंतरिम अहवालात कोणतीही मोठी चूक निदर्शनास आली नसल्याचे नमूद केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. परंतु जुन्या रुळांखालील लोखंडी ‘स्लीपर’च्या जागी सिमेंटचे ‘स्लीपर’ बसवण्याची सूचना केली आहे.

हा बदल केल्यास गाडीला धक्के बसणार नाहीत आणि वळणाच्या मार्गावरील टप्पाही मिनी ट्रेन व्यवस्थित पार पाडू शकेल. सध्याच्या स्लीपरमुळे चाकांना स्थिरता कायम ठेवता येत नाही. त्यामुळे डबे घसरण्याचा धोका वाढत असल्याचे निरीक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे.

First Published on March 16, 2019 12:40 am

Web Title: cement sleeper fit under rail rules of nerald matheran train