ऐनवेळी लसीकरणास बोलाविल्याने लाभार्थ्यांमध्ये अस्वस्थता

मुंबई : करोना लसीकरणासाठी केंद्राने उपलब्ध केलेले ‘को-विन’ अ‍ॅप शुक्रवार रात्रीपासून चालत नसल्याने पालिकेच्या यंत्रणांचा मुंबईत गोंधळ उडाला. अखेर लाभाथ्र्यांना फोन करून बोलाविण्याची वेळ पालिकेवर आली. त्यामुळे शनिवारी अ‍ॅपचा वापर न करता लसीकरण सुरू करावे लागले.

शुक्रवारी रात्रीपर्यंत लाभार्थ्यांची यादी तयार झाली तरी को-विन अ‍ॅप मधून संदेश पाठविले जात नव्हते. त्यामुळे शेवटी रुग्णालयांच्या जवळच्या भागात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी बोलाविण्यासाठी विभागातील यंत्रणा कामाला लागल्या. काही आरोग्य कर्मचाऱ्यांना शनिवारी सकाळीदेखील लसीकरणासाठी येण्याचे फोन आले.

मला रात्री साडेअकराच्या सुमारास उद्या लसीकरणासाठी यायचे असा फोन आला. गेले दहा महिने आरोग्यसेविका म्हणून काम करत आहे. आपणच ही लस घेतली तर विभागातील अन्य जण तयार होतील, असा विचार मनात ठेवून मी बीके सीत लस घेण्यासाठी आल्याचे कुल्र्यातील हेमलता नाईक यांनी सांगितले.

मला सकाळी लस घेण्यासाठी येण्याचा फोन आला. मला अचानक सांगितल्याने थोडी भीती वाटली. उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने मी थोडा वेळ घामाघूम झाले. परंतु काही मिनिटांनी माझ्या मैत्रिणीचाही लस घेण्यासाठी जाण्याचा फोन आला व तिने धीर दिला, असे सांगणाऱ्या सुवर्णा शिंदे यांची अस्वस्थता लस घेईपर्यंत होती. त्यामुळे लस घेतल्यानंतर त्यांचा रक्तदाब कमी झाला. थोड्या वेळाने त्यांची प्रकृती ठीक झाली. अ‍ॅपमध्ये शुक्रवारी रात्रीपासून अडचणी येत आहेत.

अ‍ॅप सुरू नसले तरी लसीकरण प्रक्रिया थांबलेली नाही. या नोंदीनंतर अ‍ॅपमध्ये भरण्यात येतील. ते लवकरच कार्यरत होईल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

आमच्यासाठी मोठा धक्काच

बीकेसीमध्ये येण्याचा फोन शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता आला. आम्हाला वाटले काही सव्र्हे करायचा असेल म्हणून बोलाविले आहे. परंतु इथे आल्यावर थेट नोंदणी करून कक्षात बसविले. आम्हाला आता लस देणार हे नुकतेच समजले आहे. हा आमच्यासाठी खूप मोठा धक्का असून मनात धाकधूक सुरू असल्याचे कुल्र्याच्या आरोग्यसेविका लक्ष्मी जगदनकर आणि प्रियंका कसले यांनी सांगितले. या आरोग्य केंद्रावरील आणखी सात ते आठ आरोग्यसेविकांनाही असेच बोलाविले होते. लसीकरणानंतर लक्ष्मी आणि प्रियंका या दोघींनाही अस्वस्थता, मळमळ वाटत असल्याने काही काळ देखरेखीखाली ठेवले होते.