करोनाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला विशेष पॅकेज म्हणून २५ हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी केली.

केंद्राकडून राज्याला देय असलेल्या वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) १६ हजार कोटी रुपये अजून मिळालेले नाहीत, त्याचीही तातडीने पूर्तता करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

दिल्लीत बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. या वेळी थोरात म्हणाले की, करोनाविरुद्ध लढण्यासाठी वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना मोठय़ा प्रमाणात पीपीई किटसह इतर वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे.  मात्र केंद्र सरकारकडून आवश्यक तेवढय़ा प्रमाणात ती मिळत नाहीत. तसेच केंद्राकडून महाराष्ट्राला मिळणारे जीएसटीचे १६ हजार कोटी रुपयेसुद्धा अजून मिळालेले नाहीत.  ते मिळायला हेवत, त्याचबरोबर करोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकाने महाराष्ट्राला २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज तातडीने द्यावे.

या वेळी अशोक चव्हाण म्हणाले की, मुंबई, पुणे, ठाणे या लोकसंख्या जास्त असलेल्या शहरांतच करोनाचे रुग्ण जास्त आहेत. इतर जिल्ह्य़ांत प्रादुर्भाव कमी आहे. राज्यातील दहा जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत. या १० जिल्ह्य़ांत करोना विषाणूचा प्रवेश झालेला आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागाने २२ हजार इमारती ताब्यात घेतल्या असून ५५ हजार बेड उपलब्ध केले आहेत. केंद्र सरकारने पॅकेज जाहीर केले पाहिजे, तसेच  सर्व कर्जावरचे तीन महिन्यांचे व्याज माफ करण्याची आवश्यकता आहे.

राज्य सरकार करोनाविरोधात लढताना अशांतता निर्माण करण्याचा काहींचा हेतू असावा. वांद्रे प्रकरणामागे कोण आहे याचा शोधही  घेतला जात आहे. या घटनेला रेल्वेचा कारभारही जबाबदार आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली.