मुसळधार पावसाने तीन दिवस वाताहात झाली असताना सोमवारी मध्य रेल्वेवरील तांत्रिक बिघाडांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला. दिवसभरात मध्य रेल्वेवर दोन ठिकाणी लोकल गाडय़ांत बिघाड झाला. तर सकाळी गर्दीच्या वेळी माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ एका व्यक्तीने समोरून जाणाऱ्या लोकलखाली उडी मारल्याने वाहतूक विस्कळीत झाली. तर संध्याकाळी हार्बर मार्गावर वडाळा स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला.
डीसी-एसी परिवर्तनानंतर अद्याप सावरू न शकलेल्या मध्य रेल्वेला गुरुवारपासून सलग तीन दिवस पावसाने तडाखा दिला. सोमवारी पावसाने थोडी उघडीप दिल्याने वाहतूक सुरळीत चालेल, असा प्रवाशांचा कयास होता. मात्र सकाळी ऐन गर्दीच्या वेळी डोंबिवली आणि मस्जिद येथे दोन गाडय़ांतील डब्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाले. त्यामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक तब्बल १५ मिनिटे उशिराने चालण्यास सुरुवात झाली.
याच दरम्यान सकाळी सव्वानऊच्या सुमारास शीव आणि माटुंगा या रेल्वे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरून जाणाऱ्या गाडीतून एका व्यक्तीने अप धीम्या मार्गावरून जाणाऱ्या लोकलखाली उडी मारली. ही व्यक्ती मोटरमन कक्षाच्या काचेवर आपटून गाडीखाली आली. त्यामुळे संबंधित गाडीच्या मोटरमनने जोरदार ब्रेक मारल्याने ब्रेकमध्ये बिघाड झाला. ही व्यक्ती गाडीखाली अडकल्याने गाडी तब्बल २० मिनिटे जागीच खोळंबली. त्यानंतर मोटरमन कक्षाची काच फुटल्याने आणि ब्रेकमध्ये बिघाड असल्याने ही गाडी ताशी १५ किमी या वेगाने पुढे रवाना करण्यात आली.
पाऊण तास खोळंबा
संध्याकाळी सातच्या सुमारास हार्बर मार्गावरील वडाळा स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाडय़ांची वाहतूक खोळंबली. हा बिघाड तब्बल पाऊण तास दुरुस्त न झाल्याने संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी हार्बर मार्गाची वाहतूक पाऊण तास उशिराने सुरू होती. या दरम्यान एकही सेवा रद्द झाली नसल्याचे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंह यांनी स्पष्ट केले.
आग, पावसामुळे २५ कोटींचे नुकसान
मुंबई: मध्य रेल्वेच्या इटारसी जंक्शनजवळील रिले रूट केबिन या सिग्नल यंत्रणेशी संबंधित केबिनमध्ये लागलेली आग आणि गुरुवार संध्याकाळपासून मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे गेल्या तीन दिवसांत रेल्वेचे २५ कोटींचे नुकसान झाले. दोन्ही आपत्तींमुळे तीन दिवसांत ९६ गाडय़ा रद्द झाल्या, तर मुंबईतील उपनगरीय वाहतुकीला पावसाचा फटका बसून गेल्या तीन दिवसांत तब्बल दीड हजारांहून अधिक फेऱ्या रद्द झाल्या होत्या. पावसामुळे पश्चिम रेल्वेचेही सुमारे अडीच कोटी पाण्यात गेले.
मध्य रेल्वेवर शुक्रवारी लोकल सेवा धावू शकल्या नाहीत. त्यामुळे या एकाच दिवसात तब्बल साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी आणि रविवारीही लोकल मंदगती असल्याने पावणेदोन कोटींच्या आसपास फटका बसला. मालगाडय़ांची वाहतूकही बंद पडल्याने मध्य रेल्वेला आठ कोटींना मुकावे लागले. तसेच इटारसीतील आगीमुळे मध्य रेल्वेचे १० कोटींच्या आसपास नुकसान झाले. दरम्यान, शुक्रवारी एका दिवसातच १६१८ उपनगरीय सेवांपैकी ११०० सेवा रद्द करण्यात आल्या होत्या.