|| रसिका मुळ्ये

प्रणाली सुरू होण्यात अडचणी आल्याचा फटका; बारावी निकालातील घटही कारणीभूत

प्रवेश नियमन प्राधिकरणाच्या प्रवेश प्रक्रियेतील घोळ खासगी विद्यापीठांच्या हिताचे ठरले असून यंदा अभियांत्रिकीच्या केंद्रीय सामाईक प्रवेश प्रक्रियेसाठी गेल्या दहा वर्षांत प्रथमच कमी अर्ज आले आहेत. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील जवळपास सव्वा लाख जागांसाठी अवघे ९४ हजार विद्यार्थी प्रवेशोत्सुक आहेत.

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रवेश नियमन प्राधिकरणाने घातलेला गोंधळ आणि बारावीचा घटलेला निकाल यामुळे यंदाही अभियांत्रिकी पदवी (बीई/ बीटेक) अभ्यासक्रम महाविद्यालयांची धूळधाण होणार असल्याचे स्पष्ट  झाले आहे. यंदा १० वर्षांतील कमी अर्ज अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी आले आहेत. जवळपास एक लाख ३५ हजार जागांसाठी यंदा ९४ हजार ५७५ अर्ज आले आहेत.

यापूर्वी २००७-२००८ या शैक्षणिक वर्षांत साधारण ७६ हजार प्रवेश अर्ज आले होते. त्या वेळी राज्यात १७४ महाविद्यालये होती, तर प्रवेश क्षमता ५६ हजार ८८१ होती. त्यानंतर २००८-२००९ पासून अभियांत्रिकी शाखेसाठीच्या प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांची संख्या ही एक लाखापेक्षा अधिक राहिली. मात्र त्या वेळी आलेल्या अर्जापेक्षा प्रवेश क्षमता कमी होती. त्यामुळे स्पर्धा शिगेला पोहोचली होती. विद्यार्थ्यांची मागणी असल्यामुळे २००८ पासून महाविद्यालयांना मोठय़ा प्रमाणात परवानगी देण्यात आली. दहा वर्षांत राज्यातील महाविद्यालयांची संख्या दुप्पट झाली. २०१०-२०११ मध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज आले. त्यानंतर दरवर्षी अशीच परिस्थिती आहे. यंदा महाविद्यालयांची स्थिती आधिकच बिकट होण्याची चिन्हे आहेत.

ढिसाळपणाचा फटका?

यंदा अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक असलेले भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित हे विषय घेऊन सामाईक प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काहीशी वाढली होती.

मात्र प्रत्यक्षात हे विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी पुढे आलेले नाहीत. प्रवेश प्रक्रियेच्या प्रणालीत प्रवेश नियमन प्राधिकरणाने बदल केले. मात्र, सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवण्याची वेळ प्राधिकरणावर आली. दरम्यानच्या काळात खासगी विद्यापीठांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू होती. तेथील प्रवेशाची संधी हुकण्याच्या भीतीने अनेक विद्यार्थ्यांनी खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेश निश्चित केले. आता केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत चांगले महाविद्यालय मिळण्याची शक्यता असली तरीही शुल्क भरल्यामुळे विद्यार्थी प्रवेश घेण्यास पुढे आलेले नाहीत, असे एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यानी सांगितले.

बारावीच्या घटलेल्या निकालाचाही परिणाम

बारावीच्या निकालात यंदा घट झाली. विज्ञान शाखेच्या अनेक विभागांचा निकाल जवळपास ५ ते ६ टक्क्यांनी घसरला. उत्तीर्णतेच्या प्रमाणाबरोबरच गुणांमध्येही घट झाली. सामाईक प्रवेश परीक्षेत शून्य गुण मिळालेला विद्यार्थीही प्रवेशपात्र ठरतो. मात्र त्याला बारावीच्या परीक्षेत विज्ञान विषयांमध्ये किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक असते. अनेक विद्यार्थी प्रवेश परीक्षेत पात्र ठरले असले तरी त्यांना बारावीला आवश्यक गुण मिळालेले नाहीत.

महाविद्यालये अडचणीत; थेट प्रवेशाचा मार्गही खुंटला

यंदा राज्यातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया मोठय़ा प्रमाणावर घटली. यंदा जवळपास दहा हजार जागा कमी झाल्या. महाविद्यालये बंद झाल्यामुळे आणि अधिक प्रवेश क्षमता असलेली काही महाविद्यालये खासगी विद्यापीठे झाल्यामुळे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील जागा घटल्या. त्यामुळे महाविद्यालयांना जरा बरे दिवस येण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्षात यंदा महाविद्यालयांसमोरील रिक्त जागांची समस्या कायम राहण्याची चिन्हे आहेत. महाविद्यालये रिक्त राहिलेल्या जागा पुढील वर्षी थेट प्रवेशाच्या माध्यमातून भरून काढत असत. पदविकाधारकांना द्वितीय वर्ष प्रवेशासाठी २० टक्के जागा राखीव ठेवण्यात येत असत. यंदा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने या नियमांत बदल करून ही प्रवेश क्षमता १० टक्क्यांपर्यंत मर्यादित केली. या निर्णयाविरोधात विद्यार्थी उच्च न्यायालयातही गेले होते. मात्र उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे.