मुंबई : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि बढत्यांमधील आरक्षणाबाबत विधेयकाद्वारे कायदेशीर तोडगा काढण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असे केंद्रीय सामाजिकन्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मंगळवारी सांगितले.

भाजपने काश्मीरमध्ये पीडीपीचा पाठिंबा काढला हे बरेच झाले. काश्मीरमध्ये पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात हे योग्य नाही. पाकव्याप्त काश्मीरही भारताचाच आहे. त्यामुळे पाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्यांनी पाकिस्तानला निघून जावे, असे विधानही रामदास आठवले यांनी केले.

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक व नाशिक शिक्षक मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचा पाठिंबा जाहीर करण्यासाठी रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. या उमेदवारांच्या विजयासाठी रिपाइंचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी काम करतील, असे त्यांनी जाहीर केले. या वेळी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशीष शेलार, प्रदेश सचिव संजय उपाध्याय आदी उपस्थित होते.