27 May 2020

News Flash

वृत्तपत्र वितरणाला केंद्र सरकारची परवानगी

कागद सुरक्षित असल्याचा तज्ज्ञांचा निर्वाळा

संग्रहित छायाचित्र

अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठय़ाप्रमाणेच वृत्तपत्रांच्या वितरणालाही केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आरोग्यविषयक सर्वतोपरी खबरदारी घेऊन वृत्तपत्रांचे वितरण बुधवार, १ एप्रिलपासून सुरू करण्यात येत आहे.

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी २९ मार्च रोजी देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून यासंबंधीचा खुलासा केला आहे. राज्य सरकारच्या परिपत्रकातही मुद्रित प्रसारमाध्यमांना आणि वृत्तपत्र वितरण साखळीला (वितरक, विक्रेते) अत्यावश्यक सेवेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे वृत्तपत्रे ही समाजाची गरज असून, ती कोणत्याही आडकाठीविना वितरित केली जातील हे सुनिश्चित करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे अधोरेखित होते.

वृत्तपत्राच्या कागदाद्वारे करोना पसरण्याची कोणतीही शक्यता नसून वृत्तपत्राचा कागद अत्यंत सुरक्षित असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच याबाबत निवेदन जाहीर केले असून समाजमाध्यमांवरील अशास्त्रीय संदेशावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. काही वृत्तवाहिन्या, समाजमाध्यमांवर पसरविण्यात येणारे संदेश यामुळे गेल्या काही दिवसांपासून वृत्तपत्राद्वारे करोना विषाणूचा फैलाव होतंो, असा गैरसमज पसरविण्यात आला होता. त्यामुळे मुंबई, राज्यासह देशातील अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये नागरिकांकडून वृत्तपत्र विक्रेत्यांना मज्जाव करण्यात आला होता. जगभरात अनेक राष्ट्रांमध्ये हीच परिस्थिती निर्माण झाली असून हा गैरसमज दूर व्हावा यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

आजपासून ‘लोकसत्ता’चे वितरण

राज्यातील सर्व वृत्तपत्रे गेल्या दोन आठवडय़ांपासून बंद असल्यामुळे नागरिकांना वास्तव, विश्लेषणात्मक माहिती मिळणे अवघड झाले होते. या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता’ गेले काही दिवस फक्त ई-पेपरद्वारे वाचकांच्या भेटीला येत होता. पण आज, बुधवारपासून मुंबई, पुणे आणि नागपूरमधील वाचकांना ‘लोकसत्ता’ची मुद्रित आवृत्ती वाचायला मिळणार आहे. तेव्हा आपल्याजवळील वृत्तपत्र विक्रेते आणि वितरक यांच्याकडे आपल्या प्रतीची निश्चिती करा.

भीती नाही..

वृत्तपत्राचा कागद आणि गठ्ठे हे पूर्णपणे सुरक्षित असून ते हाताळल्यामुळे करोनाचा फैलाव होउ शकत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. याशिवाय वृत्तपत्र वितरक आणि घरोघरी वृत्तपत्रे पोहोचविणाऱ्या यंत्रणेच्या सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेण्यात आली असून वृत्तपत्राबाबत कोणतीही भीती बाळगण्याची आवश्यकता नसल्याचे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे.

टाळेबंदीच्या काळात आवश्यक आणि आवश्यक नसलेल्या असा भेद न करता सर्व वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. मुद्रित माध्यमांना जी सूट देण्यात आली आहे, त्यात वृत्तपत्र वितरण व पुरवठा यांच्या साखळीलाही परवानगी देण्यात आली आहे.

– अजय भल्ला, केंद्रीय गृहसचिव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 1:05 am

Web Title: central government permits newspaper distribution abn 97
Next Stories
1 हेमलकसा आणि आनंदवनातून आता ‘मास्क’ची निर्मिती
2 मुंबईतील रेल्वे कार्यशाळांत ४०० विलगीकरण डब्यांची निर्मिती
3 करोनाच्या दिवसाला ५५०० चाचण्या
Just Now!
X