|| प्रसाद रावकर

केंद्र सरकारकडून प्रमाणपत्र बहाल

मुंबई : बकाल वस्त्या, झोपडपट्ट्यांमध्ये शौचालयांची संख्या अपुरी असल्यामुळे आजही मुंबईतील अनेक भागांत उघड्यावरच प्रात:विधी उरकले जात आहेत. असे असताना केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानात पुन्हा मुंबई हागणदारीमुक्त असल्याचे प्रमाणपत्र मुंबई महापालिकेला बहाल करण्यात आले आहे. एकीकडे आगामी वर्षात पालिकेने वस्त्या, झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी मोठ्या प्रमाणावर शौचालय बांधण्याचा मानस २०२१-२२ वर्षाच्या अर्थसंकल्पात व्यक्त करीत हतबलता व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे मुंबई हागणदारीमुक्त असल्याची टिमकीही वाजविली जात आहे.

देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत स्वच्छतेचा मंत्र पोहोचावा या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी ‘स्वच्छ भारत’ अभियानाची घोषणा केली होती. दरवर्षी हे अभियान राबबिण्यात येत असून विविध राज्यांतील अनेक शहरे त्यात सहभागी होत आहेत. अभियानाच्या घोषणेनंतर पहिल्याच वर्षी राजकीय नेते, बडे अधिकारी, कलावंत यांच्यासह अनेकांनी हाती झाडू घेत रस्ते सफाईचे नाट्य रंगले होते. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर कार्यालयाची सफाई करणे कर्मचाऱ्यांना बंधनकारक करण्यात आलेहोते. नगरसेवकही सफाई कामगारांबरोबर अभियानात सहभागी होताना दिसत होते. मात्र हा उत्साह आता मावळला आहे.

‘स्वच्छ भारत’ अभियानात मुंबई हागणदारीमुक्त जाहीर व्हावी यासाठी पालिकेने कंबर कसली होती. झोपडपट्ट्या, वस्त्यांमध्ये शौचालयांची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी मोबाइल शौचालये उभी करण्यात आली होती. तसेच शौचालयांची दुरुस्ती, रंगरंगोटीची कामेही हाती घेतली होती. अखेर पालिकेची मेहनत फळाला आणि जानेवारी २०१७ मध्ये मुंबई हागणदारीमुक्त जाहीर करण्यात आले. टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथिल होत असताना डिसेंबरमध्ये एकदा केंद्र सरकारचे अभियानाचे पथक मुंबईत दाखल झाले होते. या पथकाने झोपडपट्ट्या, निवासी परिसर, व्यावसायिक परिसर, सार्वजनिक ठिकाणे, वाहतूक केंद्र, रस्त्यालगतच्या सुमारे ४४ शौचालयांची पाहणी के ली. यापैकी तीन ठिकाणी स्वच्छ, १० ठिकाणे अतिस्वच्छ, १२ ठिकाणे उत्तम स्थितीत, तर सात ठिकाणी चांगल्या सुविधा असल्याचा, त्याचबरोबर पाच मूत्रपात्र अतिस्वच्छ, एक चांगले आणि दोन ठिकाणी चांगल्या सुविधा असल्याचा शेरा पथकाने दिला आहे. तर रस्त्यालगतच्या १२ शौचालयांतील स्वच्छतेची पाहणी के ली. या आधारे मुंबई हागणदारीमुक्त असल्याचे प्रमाणपत्र पालिकेला बहाल करण्यात आले आहे. एकंदर परिस्थिती पाहता मुंबईतील सार्वजनिक ठिकाणच्या, तसेच झोपडपट्ट्यांमधील शौचालयांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मात्र केवळ २४ शौचालये आणि आठ ठिकामच्या मूत्रपात्रांच्या तपासणीअंती मुंबई हागणदारीमुक्त ठरविण्यात आली आहे. मुंबईतील काही ठिकाणी समुद्रकिनारे, ओसाड मैदाने आदी ठिकाणी प्रात:विधी उरकण्यात येत आहे. काही ठिकाणी पालिकेने शौचालयांची व्यवस्था केली आहे. मात्र तेथे पाणी उपलब्ध नसल्याने अस्वच्छता असल्याचे दिसून येते.

शौचकुपांचे बांधकाम

  •  मुंबईमध्ये वस्ती स्वच्छता कार्यक्रमाअंतर्गत एकूण २२ हजार ७७४ शौचकुपे प्रस्तावित आहेत.
  •  त्यापैकी आठ हजार ६३७ नवी शौचकुपे असून १४ हजार १३७ शौचकुपांचे पुनर्बांधकाम करण्यात येणार आहे.
  •  पालिकेने ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी २० हजार ३०१ शौचकुपे बांधण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.
  •  त्यापैकी चार हजार ५९६ शौचकुपे बांधून पूर्ण झाल्याचा, तर १५ हजार ७०५ शौचकुपांचे बांधकाम सुरू असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.
  •  अन्य शहरांमधून मुंबईत येणाऱ्यांसाठी २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत १०८ स्वच्छतागृहे बांधण्याचा पालिकेचा मानस आहे.