12 December 2017

News Flash

ग्रामीण भागातील मुलांच्या आरोग्यासाठी केंद्राचा पुढाकार

मुले ही देशाचे भविष्य असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास केंद्र शासनाचं प्राधान्य असणार आहे.

पालघर, प्रतिनिधी | Updated: February 6, 2013 4:15 AM

मुले ही देशाचे भविष्य असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास केंद्र शासनाचं प्राधान्य असणार आहे. गेली आठ वर्ष राष्ट्रीय ग्रामीण अभियानामध्ये विविध उपक्रम राबविले जात असून त्याचे चांगले परीणाम दिसून येत आहेत. पल्स पोलियो मोहिमेमुळे देश पोलियोमुक्त झाला आहे. त्याचप्रमाणे या नव्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेमुळेही मुलांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होईल असा विश्वास काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पालघर येथे आज (बुधवार) सकाळी व्यक्त केला. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेचा शुभारंभ आज पालघरमध्ये करण्यात आला. या मोहिमेसाठी कोणत्याही निधीची कमतचरता भासू दिली जाणार नाही. तसेच संबंधीत अधिकारी आणि कर्मचा-यांनी परिणामकारपणे ही योजना राबवावी असेही सोनिया गांधी यांनी सांगितले.
कार्यक्रमापूर्वी सोनियांनी सर्व आरोग्य केंद्रांची पाहणी केली. त्यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांनी त्यांना तेथील उपचारांची माहिती करून दिली. ही माहिती देण्यासाठी एकूण ३५ स्वयंसेवकांची टीम तयार करण्यात आली होती. त्यासाठी त्यांना हिंदी आणि इंग्रजी भाषेचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आदिवासी आश्रम शाळेतील मुलांनीच केले होते. कार्यक्रमाला पालघर-डहाणू परिसरातील जवळपास १८ हजार मुले या उपस्थित होती.  
आरोग्य आणि मानव संसाधन या खात्यासाठी पैसे कमी पडू देणार नाही, असंही सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या. आम्हाला राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजना  ग्रामीण भागात जास्त परिणामकारकपणे राबवायची असल्याने आम्ही ग्रामीण भागाची निवड केल्याचं त्या पुढे म्हणाल्या. ग्रामीण भागातील आरोग्य सेविकांना (आशा) यापुढे मायक्रो एटीएमद्वारे पैसे मिळणार असून या योजनेचा शुभारंभ यावेळी करण्यात झाला.
केंद्रातील यूपीए सरकारच्या महत्त्वाकांक्षी आधार कार्ड योजनेच्या शुभारंभासाठी नंदुरबार जिल्ह्य़ाची निवड करण्यात आली होती, तसेच ग्रामीण रोजगार हमी योजनेचा शुभारंभही महाराष्ट्रात झाला होता, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. केंद्रीय आरोग्य मंत्री गुलाब नबी आझाद आणि राज्याचे आरोग्य मंत्री सुरेश शेट्टीही यावेळी उपस्थित होते.  

First Published on February 6, 2013 4:15 am

Web Title: central govt comes forward for rural childrens health
टॅग Palghar,Sonia Gandhi