महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय गोंधळाचे केंद्रस्थान असलेल्या मुंबईत शुक्रवारचा दिवस रेल्वेमार्गावरील गोंधळाने गाजला. पश्चिम, मध्य आणि हार्बर या तीनही उपनगरीय मार्गावर शुक्रवारी विविध वेळी झालेल्या तांत्रिक बिघाडांमुळे वेळापत्रक कोलमडले. पश्चिम आणि मध्य रेल्वेवर संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या बिघाडांमुळे प्रवाशांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. मध्य रेल्वेवर तर रात्री उशिरापर्यंत गोंधळाची स्थिती होती.
हार्बर मार्गावर पहाटे पाचच्या सुमारास वडाळा येथून बाहेर पडणाऱ्या मालगाडीची चाके जागच्या जागी फिरू लागली. त्यामुळे मालगाडी जागीच थांबली. हा प्रकार पावसामुळे, रुळांवर तेल अथवा तत्सम पदार्थ सांडल्यामुळे किंवा चाकांमध्ये बिघाड असल्यामुळे होऊ शकतो. हा बिघाड तातडीने दुरुस्त करण्यात आला. मात्र त्या दरम्यान हार्बर मार्गावरील चार अप आणि चार डाउन सेवा रद्द करण्यात आल्या. गर्दीच्या वेळेआधी ही घटना घडली असली, तरी गाडय़ा खोळंबल्याने दुपापर्यंत त्याचा परिणाम जाणवत होता.
पश्चिम रेल्वेवर चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाडीच्या ब्रेकचा पाइप मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ तुटला. गाडी ग्रँटरोड स्थानकात असताना या बिघाडाबाबत गार्ड व मोटरमनला समजले. त्यानंतर ही गाडी ग्रँटरोड स्थानकात रद्द करून ती पुन्हा मुंबई सेंट्रलला नेण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील गाडय़ा २०-२५ मिनिटे उशिराने धावत होत्या. ही ऐन गर्दीची वेळ असल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.
मध्य रेल्वेवर दुपारी ३.५०च्या सुमारास कल्याणला जाणाऱ्या धीम्या गाडीच्या एका डब्यात करीरोड स्थानकाजवळ बिघाड झाला. हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी एक तास लागला. दरम्यान या कल्याण गाडीच्या मागे असलेल्या टिटवाळा, डोंबिवली आणि कुर्ला या तीन गाडय़ा खोळंबल्या.
 या कालावधीत भायखळा आणि माटुंगा या स्थानकांदरम्यानची धीम्या मार्गावरील वाहतूक डाउन जलद मार्गावरून वळवण्यात आली. परिणामी सर्व उपनगरीय गाडय़ांची वाहतूक २५-३० मिनिटे उशिराने चालू होती. अखेर ४.५० वाजता बिघाड झालेली गाडी दादपर्यंत आणण्यात आली. दादर स्थानकात ही गाडी रद्द करून ती कुर्ला कारशेड येथे पाठवण्यात आली.