२०३४च्या विकास आराखडय़ात समाविष्ट केल्याने संभाव्य बाधितांमध्ये नाराजी

दक्षिण मुंबईतील वाहतुकीच्या समस्या सोडविण्याकरिता १९८१पासून प्रस्तावित असलेला गिरगाव चौपाटी ते लालबाग दरम्यानचा ‘सेंट्रल आयलंड एक्स्प्रेस वे’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मार्गामुळे तब्बल ९०० इमारती बाधित होत असल्याने रहिवाशांचा विरोध लक्षात घेऊन हा प्रकल्प मधल्या काळात गुंडाळल्यात जमा होता. मात्र, महापालिकेच्या २०३४च्या नव्या विकास आराखडय़ात गिरगाव चौपाटी ते लालबाग दरम्यान ‘सेंट्रल आयलंड एक्स्प्रेस वे’ उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे दाखविण्यात आले आहे. परिणामी रस्ता रुंदीकरणात बेघर होण्याच्या भीतीने येथील रहिवाशांच्या पोटात गोळा उठला असून त्यांनी नुकतीच या संदर्भात महापालिका आयुक्तांची भेट घेतली. ‘मेट्रो-३’ आणि सागरी किनारा मार्गामुळे वाहतुकीचे नवे पर्याय उभे राहत असून या मार्गाची गरज काय असा रहिवाशांचा सवाल आहे.

हा मार्ग उभारल्यानंतर उपनगरातून लालबाग मार्गे नरिमन पॉइंटला झटपट पोहोचता येणार आहे. मात्र, त्यामुळे येथील साधारणपणे ९०० इमारतींमधील सुमारे ९ ते १० हजाराहून अधिक कुटुंबांच्या पुनर्वसनाचे मोठे आव्हान निर्माण होणार आहे. यात गिरगाव चौपाटीपासून पंडिता रमाबाई मार्ग, जावजी दादाजी मार्ग, मदन मालविया मार्ग, साने गुरुजी मार्ग, केशवराव खाडे मार्ग आदी रस्त्यांलगत दुतर्फा उभ्या असलेल्या चाळी बाधित होत आहेत. यापैकी अनेक चाळी मोडकळीला आल्या आहेत. यात मोठय़ा प्रमाणावर उपकरप्राप्त इमारती बाधित होत आहेत. रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावामुळे या चाळींच्या पुनर्विकासात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

रहिवाशांचा विरोध लक्षात घेत गिरगाव चौपाटी येथील पंडिता रमाबाई मार्ग ते लालबागच्या डॉ. आंबेडकर मार्गापर्यंतच्या या रस्त्याची रुंदी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पूवर्0ी हा रस्ता काही ठिकाणी ३६.६० मीटर, तर काही ठिकाणी ४२.६० मीटर रुंद करण्यात येणार होता. त्याऐवजी रस्त्याची रुंदी काही ठिकाणी २७.४५ मीटर, तर काही ठिकाणी ३६.६० मीटर करण्याचे प्रस्तावित करण्यात आले. त्यामुळे काही चाळींची सुटका झाली. तथापि, आजही असंख्य इमारती या प्रकल्पाच्या आड येत आहेत.

आता मुंबईच्या २०१४-३४ च्या सुधारित विकास आराखडय़ात या मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. याची कुणकुण लागल्यामुळे बाधित होणाऱ्या इमारतींमधील रहिवासी चिंतेत आहेत.  रहिवाशांनी आपापल्या परिसरातील पालिकेच्या विभाग कार्यालयामध्ये दाद मागण्याचा प्रयत्न केला. मात्र पालिका अधिकाऱ्यांनी विकास आराखडय़ातील बाब असल्याने पालिका मुख्यालयाकडे अंगुलीनिर्देश करीत आपली सुटका करून घेतली.

अखेर रहिवाशांनी मलबार हिल मतदारसंघातील आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठवडय़ात पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी संबंधित विषयावर अभ्यास करण्याचे मान्य केले.

आता गरज तरी काय?

दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रिन्सेस रोड येथील उड्डाणपुलापासून थेट कांदिवलीपर्यंत सागरी किनारा मार्ग उभारण्यात येत आहे. तसेच अंधेरी सिप्झ-वांद्रे-कुलाबा दरम्यान भूमिगत मेट्रो प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात वाहतुकीसाठी दोन नवे मार्ग खुले होणार आहेत. मग ‘सेंट्रल आयलंड एक्स्प्रेस वे’ची काय आवश्यकता आहे, असा रहिवाशांचा प्रश्न आहे.

पुरातन वास्तूही बाधित

विल्सन महाविद्यालय, आगाखान जिमखाना, मेकॅनन हॉस्टेल या पुरातन वास्तू, तसेच आचार्य विनोबा भावे प्रदर्शनी, रुग्णालय, पुरातन धार्मिक स्थळे आदी बाधित होत आहेत.