13 August 2020

News Flash

धारावीकरांना मोठय़ा संख्येने अलगीकरणात ठेवा

केंद्रीय वैद्यकीय पथकाची पालिकेला सूचना

केंद्रीय वैद्यकीय पथकाची पालिकेला सूचना

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत धारावीमधील रहिवाशांना मोठय़ा संख्येने अलगीकरणात ठेवावे आणि त्यासाठी अलगीकरणाच्या क्षमतेत वाढ करावी, असे आदेश केंद्रीय वैद्यकीय पथकाने बुधवारी महापालिकेला दिले. त्यामुळे पालिकेने अलगीकरणाची क्षमता वाढवण्यासाठी जागांचा शोध सुरू केला आहे.

दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असलेल्या मुंबई आणि पुणे शहरांची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय आरोग्य पथक तैनात केले आहे. रुग्णसंख्या अधिक असलेल्या वरळी परिसराची या पथकाने मंगळवारी पाहणी केली. आशिया खंडात सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या धारावीची या पथकाने बुधवारी पाहणी केली.

धारावीमध्ये अत्यंत दाटीवाटीने छोटी छोटी घरे उभी आहेत. धारावीची लोकसंख्या सुमारे आठ लाख ५० हजारांच्या घरात आहे. गेल्या काही दिवसांपासून धारावीमध्ये करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. धारावीमधील कल्याणवाडी, मुस्लीम नगर, मदिना नगर, मुकुंद नगर, सोशल नगर, डॉ. बालिगा नगर परिसरात मोठय़ा संख्येने करोनाबाधित सापडले आहेत. परिणामी केंद्रीय वैद्यकीय पथकाने बुधवारी धारावी परिसराची पाहणी केली.

पालिकेने राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि धारावी म्युनिसिपल शाळेत अलीगकरणासाठी केलेल्या व्यवस्थेची पाहणी या पथकाने केली. घरोघरी जाऊन रहिवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी घेण्यात येत असलेल्या खबरदारीची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी पथकाला दिली.

करोनाबाधित सापडल्यामुळे टाळेबंद करण्यात आलेला परिसर आणि अलगीकरणात ठेवलेल्यांसाठी दररोज दुपारी आणि रात्री २८ हजार जेवणाची पाकिटे उपलब्ध करण्यात येत आहेत. तसेच विविध धान्याचा समावेश असलेली २० हजार पाकिटांचे वाटप करण्यात येत आहे. तसेच गरजवंतांना आवश्यक ती औषधेही घरपोच करण्यात येत असल्याची बाब पालिका अधिकाऱ्यांनी पथकाच्या निदर्शनास आणून दिली.

पालिके चा शोध सुरू

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आजघडीला धारावीमधील एक ते सव्वालाख रहिवाशांना अलीगकरणात ठेवणे गरजेचे असल्याचे मतही या पथकाने व्यक्त केल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि धारावी म्युनिसिपल शाळेमध्ये एकूण एक हजार नागरिकांना अलगीकरणात ठेवण्याची व्यवस्था आहे. आता अलगीकरणाची क्षमता वाढविण्यासाठी नव्या जागांचा शोध पालिकेने सुरू केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 2:50 am

Web Title: central medical team instructions bmc over dharavi zws 70
Next Stories
1 लोककलावंत, तमाशा कलाकार, तंत्रज्ञांची उपासमार
2 प्रतीक्षानगरमध्ये आगंतुक नातेवाईकांमुळे रहिवासी त्रस्त
3 पोलिसांची ‘टिकटॉक’वर नजर
Just Now!
X