तीन हजार मीटर पर्जन्यजलवाहिन्यांची पावसाळ्यापूर्वी पुनर्बाधणी

पावसाच्या पाण्याचा जलद गतीने निचरा व्हावा यासाठी मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण तीन हजारांहून अधिक मीटर लांबीच्या पर्जन्यजलवाहिन्यांची पुनर्बाधणी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे पर्जन्यजलवाहिन्यांची पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता दर तासाला ५० मिमी एवढय़ा प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे, परळ, लालबाग, माझगाव या परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.

ब्रिटिशांनी पर्जन्यजलवाहिन्या त्या वेळच्या गरजांनुसार बांधल्या होत्या. त्यांची सरासरी क्षमता साधारणपणे प्रत्येक तासाला २५ मिलिमीटर (मीमी) एवढय़ा पावसाचे पाणी वाहून नेण्याची होती. शहरातील वाढत्या काँक्रिटीकरणामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्याला मर्यादा आल्या आहेत. परिणामी शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होत होती. म्हणून या वाहिन्यांची क्षमता वाढविण्यात येत आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी शहर भागात ३ हजार ९८ मीटर लांबीच्या पर्जन्यजलवाहिन्यांची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यापैकी २ हजार ६१३ मीटर लांबीच्या पर्जन्यजलवाहिन्यांच्या पुनर्बाधकामाची कामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित ४८५ मीटर लांबीच्या पर्जन्यजलवाहिन्यांची कामेदेखील पावसाळ्यापूर्वी होणार असल्याची माहिती पालिकेच्या पर्जन्यजल खात्याचे प्रमुख अभियंता श्रीकांत कावळे यांनी दिली.

लालबाग उड्डाणपुलाखालील शांताराम पुजारे चौकात पाण्याचा निचरा होण्यासाठी २ मीटर रुंदी व १.५ मीटर उंची असणारी ‘बॉक्स ड्रेन’ तयार करण्यात आली आहे. माझगांवच्या जिनाभाई मुलजी राठोड मार्गालगत असलेल्या वाहिनीचा सुरुवातीचा भाग आता १००० हजार मिमी व्यासाचा व त्यापुढील भाग १४०० मिमी व त्यानंतरचा भाग हा १८०० मिमी व्यासाचा करण्यात आला आहे.  भायखळ्याच्या बुऱ्हानी महाविद्यालयाजवळचा परिसरातील वाहिनी सुरुवातीला १००० हजार मिमी आणि पुढील भागात १४०० मिमी व्यास करण्यात आली आहे. भायखळ्याच्या आंबेडकर मार्ग व मंडलिक पूल (एस ब्रिज) यांच्या जंक्शनजवळील सुधारित आरेखनांनुसार ६०० मिमी व्यासाची व सुमारे २०० मीटर लांबीची करण्यात आली आहे. आर्थर रोड परिसरात जुन्या पद्धतीची कमानी वाहिनी होती. मोनो रेल्वेच्या कामामुळे या पर्जन्यजलवाहिनीस हानी पोहचली होती. ती सुधारित आरेखनांनुसार वाढविण्यात आली आहे.  केईएम परिसरातील पर्जन्यजलवाहिनीचा भाग काही वर्षांपूर्वी खचला होता. तिचे पुनर्बाधकाम झाले आहे. जे. के. भसिन मार्ग व राजयोगी जयमाल सिंह मार्ग  चौकातही ‘बॉक्स ड्रेन’ पद्धतीने पुनर्बाधकाम करण्यात आले आहे. हे काम मे महिन्यापर्यंत ते पूर्ण होईल.

या परिसराला दिलासा

परिणामी येत्या पावसाळ्यात लालबाग उड्डाणपुलाखालील शांताराम पुजारे चौक, माझगाव परिसरातील जिनाभाई मुलजी राठोड मार्ग, भायखळा परिसरातील बुऱ्हानी महाविद्यालय व मंडलिक पूल, चिंचपोकळी परिसरातील सानेगुरुजी मार्ग, केईएम रुग्णालय व एफ उत्तर विभागातील राजयोगी जयमाल सिंह मार्ग इत्यादी सात ठिकाणी व लगतच्या परिसरात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा अधिक जलद गतीने निचरा होऊ  शकेल.