घरकाम करणाऱ्या महिला, दुकानातील कर्मचारी यांची धरपकड; मध्य रेल्वेकडून ३० प्रवाशांवर कारवाई

सुशांत मोरे, लोकसत्ता

मुंबई : केवळ अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल प्रवासाची सोय असल्याने हातावर पोट असलेल्या अनेक सामान्य प्रवाशांना ‘अवैध’ प्रवासाचा मार्ग पत्करावा लागत आहे. यात घरकाम करणाऱ्या महिला, दुकानात काम करणारे विक्रेते, सॅण्डविच, पाणीपुरी वा तत्सम व्यवसाय करणारे छोटे व्यावसायिक, औषध विक्रेते अशा अनेकांचा समावेश आहे.

सध्या सरकारी-पालिका कर्मचारी, पोलीस, रुग्णालय, प्रयोगशाळा, वीज कंपन्या, विमान दुरुस्ती आदी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. त्यांना ओळखपत्रावर किं वा सरकारकडून मिळणाऱ्या क्यूआर कोड ई पासवरच प्रवासाची मुभा आहे. इतरांकरिता लोकलचे दरवाजे बंद असल्याने खासगी कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह छोटे-मोठे व्यवसाय करणारे व त्यांच्याकडे काम करणारे कामगार, रुग्णालयात उपचारासाठी जाणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक इत्यादी भरडले जात आहेत. म्हणून अनेक मंडळी विविध महापालिका वा अत्यावश्यक सेवांचे बनावट ओळखपत्र, क्यूआर कोडआधारित बनावट ई-पास तयार करून लोकलमधून प्रवास करण्याचा प्रयत्न करत आहेत.

एका प्रकरणात सॅण्डविच विक्रेत्याच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे मुंबई पालिकेच्या नावाचा क्यूआर कोड पास आढळून आला. काही जण प्रवासासाठी नगरसेवकांकडूनही शिफारस पत्र, अत्यावश्यक पास, ओळखपत्र मिळवून लोकल प्रवासाची संधी साधत आहेत.

खासगी प्रवास परवडत नाही आणि बेस्ट-एसटीने कित्येक तास मोडतात. म्हणून नाईलाजाने अवैध प्रवासाचा मार्ग पत्करणाऱ्या या प्रवाशांवर कारवाई करताना रेल्वे कर्मचाऱ्यांच्याही जीवावर येते. रेल्वे प्रवासाचा प्रयत्न करणाऱ्या ३० प्रवाशांवर मध्य रेल्वेने कारवाई के ली, तर वडाळा लोहमार्ग पोलिसांनी तीन प्रवाशांना अटक केली. वडाळा ते मशीद रोड असा प्रवास करणारे हे प्रवासी एका सॅण्डवीचच्या दुकानात काम करतात. दुसऱ्या एका प्रकरणात वडाळा ते सीएसएमटी प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाकडे पालिकेचेच बनावट ओळखपत्र आढळले. ही व्यक्ती चपलांच्या दुकानात कामाला आहे. ५०० ते १००० रुपयांत त्यांनी हे बनावट ओळखपत्र तयार करून घेतल्याची माहिती वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी दिली. लोकल प्रवासाची परवानगी नसल्याने अवैध प्रवासाचा मार्ग पत्करावा लागत आहे. अनेकांना कामावर जाणे भाग आहे. अशांना लोकल प्रवासाची परवानगी हवी, अशी मागणी मुंबई रेल प्रवासी संघाचे सरचिटणीस कै लास वर्मा यांनी के ली.

नगरसेवकांचे शिफारसपत्र अवैध

मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेशन दुकानदार, औषध विक्र ेते इत्यादींकडून नगरसेवकांचे शिफारसपत्र किं वा त्यांच्याकडूनच अत्यावश्यक ओळखपत्र बनवून प्रवासाचा प्रयत्न झाला. कु ल्र्यातील एका नगरसेवकाने खासगी कर्मचाऱ्यांना पालिकेचे अत्यावश्यक सेवा कर्मचारी म्हणून पास उपलब्ध के ला. हा पास जप्त करून प्रवाशावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. असा पास नगरसेवकांकडून उपलब्ध के ला जाऊ शकत नाही, याकडे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष वेधले. असे प्रवासी आढळल्यास त्यांना रेल्वे पोलीस, तिकीट तपासणीसांकडून परत पाठविले जाते. काही वेळा त्यांच्याजवळील ओळखपत्र जप्त करून २६० रुपये दंड ठोठावला जातो. आतापर्यंत अशा ३० प्रवाशांवर कारवाई झाली आहे.

तिघांवर गुन्हे दाखल

अत्यावश्यक कर्मचाऱ्यांचे बनावट ओळखपत्र बनवून प्रवास करणाऱ्या आतापर्यंत तीन प्रवाशांवर पश्चिम रेल्वेने कारवाई के ली आहे. यात दोन बोरीवली आणि एका प्रवाशावर मीरा रोड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकू र यांनी सांगितले. तर ओळखपत्र बनविणाऱ्या एका दलालाही अटक के ली आहे. या प्रवाशांकडे पालिके च्या नावाने ओळखपत्र होते.

ज्यांना प्रवासाची मुभा

दिली आहे, त्यांनीच प्रवास करावा. ज्यांना प्रवासाची मुभा नाही, अशांनी अवैधरित्या प्रवास टाळावा. याशिवाय बनावट ओळखपत्र किं वा पास तयार करुन प्रवास करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे.

– शिवाजी सुतार ,मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे