News Flash

चार तासांच्या खोळंब्यानंतर सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल सुरू; अंबरनाथकडे जाणारा मार्ग ठप्पच

लोकलसह लांब पल्ल्याच्या वाहतुकीवरही परिणाम

कल्याणजवळ लोकलचे ५ डबे घसरल्याने मध्य रेल्वे ठप्प

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुर्ला-अंबरनाथ लोकलचे पाच डबे रुळावरुन घसरल्याने पूर्णपणे कोलमडलेली मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येते आहे. कल्याण-विठ्ठलवाडी दरम्यान सकाळी ६ च्या सुमारास लोकलचे पाच डबे घसरल्याची घटना घडली. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

लोकलचे पाच डबे घसरल्याने अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. मात्र ४ तासांच्या खोळंब्यानंतर सकाळी १० च्या सुमारास अप मार्गावरील वाहतूक सुरू झाली. त्यामुळे सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल सुरू झाल्या. मात्र डाऊन मार्गावरील घसरलेले लोकल डबे अद्याप बाजूला काढण्यात न आल्याने अंबरनाथकडे जाणारी रेल्वे सेवा अद्याप पूर्ववत झालेली नाही. डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेस गाड्या रेल्वेकडून रद्द करण्यात आल्या आहेत. तर इंद्रायणी एक्सप्रेस दिवामार्गे वळवण्यात आली आहे.

‘या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. घसरलेले डबे हटवून रेल्वेसेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही,’ अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी दिली आहे.

या दुर्घटनेत रेल्वे गाड्यांना वीज पुरवठा करणाऱ्या विजेच्या खांब्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही खांब डब्यांच्या धडकेमुळे कोसळले आहेत. यासोबतच अपघातात रेल्वे रुळ आणि ओव्हरहेड वायरचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत होण्यास बराच वेळ लागण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचता यावे, यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने जादा बस सोडल्या आहेत. रेल्वे सेवा ठप्प असल्याने लोकांनी रिक्षा, बस या पर्यायांचा वापर सुरू केला आहे. मात्र यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे लोकांना प्रचंड प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 7:36 am

Web Title: central railway affected after local trains coaches derails near kalyan
Next Stories
1 नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतरचे आर्थिक नियोजन
2 नोटाबंदीमुळे बाजारातील ‘उल्हास’ गायब!
3 १५०० कोटींची खुशामत!
Just Now!
X