हे सरकार सर्वच प्रश्नांची सोडवणूक करण्यास १०० टक्के अपयशी ठरले आहे. सहनशीलतेचा अंत हे सरकार पाहत आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात जेवढी आंदोलने झाली नाही. तितकी या सरकारच्या काळात झाली. बुलेट ट्रेन ऐवजी रेल्वेच्या या समस्या सरकारने आधी सोडवल्या पाहिजेत अशी मागणी करत फक्त भाषणांमध्येच भाजपाचे अच्छे दिन आले आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला लगावला. अप्रेंटिस प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेत नोकरी मिळालीच पाहिजे, अशी मागणी करत शेकडो विद्यार्थी दादर- माटुंगादरम्यान रेल्वे रुळावर उतरले आहेत. पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर लाठीमार केला. विद्यार्थीही आक्रमक झाले आहेत. अजूनही हीच परिस्थिती कायम आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दांत सरकारचा निषेध व्यक्त केला.

जाणून घ्या, काय आहेत रेल रोको करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या?

यापूर्वीही शेतकरी आंदोलकांच्या पायातून रक्त आल्याशिवाय हे सरकार जागे झाले नाही. आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरही हेच अपेक्षित आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशाला बुलेट ट्रेनऐवजी रेल्वेचे हे प्रश्न सोडवण्याची गरज आहे. लोकसभेत विद्यार्थ्यांचा हा प्रश्न मी मांडणार आहे. सोशल मीडियाची या सरकारला भारी हौस आहे. त्यामुळे रेल्वेमंत्र्यांनाही मी लगेचच ट्विट केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

सरकारला हे माहीत नव्हतं का हे आंदोलन चिघळतंय. रेल्वे प्रशासनालही माहिती नव्हती का असा सवाल करत या मुलांबरोबर बोलण्यास एकही अधिकारी बोलण्यास पुढे येत नाही, हे अपयश आहे, असा उद्वेग त्यांनी व्यक्त केला.