प्रवाशांनी जास्तीत जास्त मोबाइल तिकीट अ‍ॅपला प्रतिसाद देण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मोठय़ा तांत्रिक अडचणींचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. जानेवारी २०१९ ते जून २०१९ पर्यंत मोबाइल तिकीट अ‍ॅपमधील मुंबई विभागातील १६ हजार ८१३ व्यवहार अपूर्ण झाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हे प्रमाण वाढतच असून त्यातील तांत्रिक अडचणी अद्यापही सुटलेल्या नाहीत.

तिकीट खिडक्यांसमोरील रांगेतून प्रवाशांची सुटका व्हावी यासाठी चार वर्षांपूर्वी मध्य व पश्चिम रेल्वेवर मोबाइल अ‍ॅप तिकीट सेवा सुरू झाली. ही सेवा सुरू होताच त्याला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्याला प्रतिसाद वाढवण्यासाठी रेल्वेकडून जनजागृती हाती घेण्यात आली. उद्घोषणा, तिकीट खिडक्यांवर लावलेले स्क्रीन, भित्तिपत्रके यामार्फत मोबाइल तिकीट सेवा जास्तीत जास्त प्रवाशांपर्यंत पोहोचवली. मध्य रेल्वेवर १३ जुलै रोजी मोबाइल तिकीट अ‍ॅपमधून ६१ हजारपेक्षा जास्त तिकीट काढण्यात आली व या तिकिटामार्फत ३ लाख ३१ हजार प्रवाशांनी प्रवास केला. जून २०१९ मध्ये हीच संख्या वाढून ५३ हजार तिकीट विक्री झाली होती. प्रवाशांचा प्रतिसाद जरी मिळत असला तरी मोबाइल तिकीट अ‍ॅपमधील तांत्रिक अडचणी काही संपलेल्या नाहीत.

सव्‍‌र्हर डाऊन, तसेच नेटवर्क न मिळणे इत्यादी कारणांमुळे तिकीट काढताना प्रवाशांना मोठा मनस्तापही होत आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून रेल्वे तिकिटाचे शुल्क भरताना त्याच वेळी तांत्रिक समस्या उद्भवते. यात काही जणांचे शुल्क भरले जात नाही, तर काहींचे शुल्क भरले जाते, मात्र तिकीट मिळत नाही. ज्यांचे शुल्क अदा झाले, परंतु तिकीट मिळाले नाही अशा प्रवाशांना शुल्क परतावा दिला जातो. त्यामुळे जानेवारी २०१९ ते जून २०१९ पर्यंत १६ हहजार ८१३ व्यवहार अपूर्णच राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली. रेल्वेच्या क्रिसकडून (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम) हे मोबाइल अ‍ॅप बनवण्यात आले असून त्यांना अद्यापही तांत्रिक अडचणी सोडवण्यात यश आलेले नाही.

रेल्वे हद्दीत ३० मीटर अंतरापर्यंत जीपीएस यंत्रणा कार्यरत असते. त्यातही अनेक अडथळे येत असल्याने तिकीट काढणे वेळखाऊ प्रक्रिया होती. परंतु रेल्वेने जीपीएसची व्याप्ती वाढवली आणि घरांतही जीपीएस नेटवर्क मिळाल्याने अ‍ॅपवरील तिकीट सहज मिळवता येऊ लागले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मोबाइल अ‍ॅपवर तिकीट काढताना तांत्रिक अडचण येत असून तिकीट काढले जात नाही.