मध्य रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाडय़ांची ४०० तिकिटे जप्त; तीन दलालांना अटक

मुंबई : मुंबई महानगरात मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या तिकिटांची अनधिकृत विक्री करणाऱ्या दलालांची मध्य रेल्वेने धरपकड केली असून डिसेंबरमध्ये तीन दलालांना अटक करून सुमारे ४०० ई-तिकिटे हस्तगत करण्यात आली. जप्त केलेल्या तिकिटांची एकूण किंमत सहा लाख रुपयांहून अधिक आहे.

रेल्वेची तिकिटे मिळवण्यासाठी प्रवाशांची नेहमीच धडपड सुरू असते. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तिकीट काढताना प्रतीक्षायादीचा सामना करावा लागतो. रेल्वेने संकेतस्थळावर तिकीट विक्री सुरू केल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच प्रतीक्षायादी कशी येते, असा प्रश्न सर्वसामान्यांना कायम पडतो. यात दलालांचे जाळे कार्यरत असल्याचे दलालांच्या धरपकडीतून स्पष्ट झाले आहे. सध्या टाळेबंदीत राज्यात व राज्याबाहेर विशेष मेल-एक्स्प्रेसच सोडल्या जात आहेत. गेल्या चार महिन्यांपासून काही गाडय़ांसाठी प्रतीक्षायादी जारी करण्यात येत असून प्रवाशांना तिकिटे मिळणेही कठीण झाले आहे.

त्याचाच गैरफायदा तिकीट दलाल घेत आहेत. काही प्रवासी अशा दलालांकडे जातात आणि त्यांच्याकडून प्रवाशांना आरक्षण असलेल्या तिकिटाचे आमिषही दाखवले जाते.

अनधिकृत तिकीट विक्री करणाऱ्या अशा दलालांची धरपकड डिसेंबरमध्ये मुंबईत करण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये सहा लाख ४३ हजार ५२७ रुपये किमतीची ४०० ई-तिकिटे जप्त करण्यात आली असून आतापर्यंत तीन दलालांना अटक के ली आहे. वाशी नाका येथे २३ डिसेंबर रोजी अटक केलेल्या नरेंद्र प्रजापतीकडून (२९) चार लाख ९१ हजार १५० रुपये किमतीची २७३ तिकिटे हस्तगत करण्यात आली, तर रे रोड येथे अटक के लेल्या शमीम शेखकडून ६८ ई-तिकिटे आणि वाशी नाका येथून अटक के लेल्या शक्ती चौधरीकडून ५९ ई-तिकिटे जप्त करण्यात आली.

२९६ प्रवाशांवर कारवाई

डिसेंबरमध्ये मेल-एक्स्प्रेस गाडय़ांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या २९६ प्रवाशांना पकडण्यात आले आहे. त्यांच्यावर केलेल्या कारवाईतून जवळपास दोन लाख रुपये दंड वसूल करण्यात आला, तर दुसऱ्या प्रवाशाला अनधिकृतपणे तिकीट हस्तांतरण केल्याची ६४ प्रकरणे उघडकीस आली आहेत.

विशिष्ट सॉफ्टवेअर

ई-तिकीट काढण्यासाठी अनधिकृत दलालांकडून विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येतो. या सॉफ्टवेअरद्वारे तिकिटे अधिक झटपट काढली जातात. रेल्वे स्थानकातील पीआरएस तिकीट खिडक्या सुरू होताच रेल्वेच्या सॉफ्टवेअरमध्ये शिरकाव करून काही सेकंदातच तिकिटे आरक्षित केली जातात. अनधिकृतबरोबरच अधिकृत दलालही त्यांना ई-तिकीट काढण्यासाठी दिलेल्या वैयक्तिक आयडीचा गैरवापर करतात.