कुर्ला स्थानकात एका खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर गलिच्छपणे लिंबू सरबत बनवितानाचे चित्रीकरण समाजमाध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर मध्य रेल्वेला जाग आली असून खुल्या सरबत विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे. यामध्ये काला खट्टा, ऑरेंज ज्यूस यासारख्या पेयांचाही समावेश आहे. दरम्यान सीलबंद पेयांची विक्री सुरु राहणार आहे. याशिवाय सर्व स्थानकांवरील खाद्यदुकानांतील स्वच्छता आणि पदार्थाचा दर्जा तपासण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पुढील आठवडाभर ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

कुर्ला रेल्वे स्थानकातील सात व आठ नंबर फलाटावरील खाद्यपदार्थ स्टॉलच्या छतावर एक व्यक्ती घाणेरडय़ा पद्धतीने लिंबू सरबत बनवताना आढळली होती. एका जागरूक प्रवाशाने हा प्रकार मोबाइलद्वारे चित्रित करून समाजमाध्यमांवरून प्रसारित केला. त्यानंतर काही तासांतच ही चित्रफीत सर्वत्र पसरली व समाजमाध्यमांवरून मुंबईकरांचा संताप व्यक्त होऊ लागला. त्यामुळे लगेच हालचाली करत मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्रीच या स्टॉलला टाळे ठोकले. या प्रकाराची चौकशीही करण्यात येणार आहे.

‘स्टॉल्समधील व त्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असला पाहिजे. तसेच खाद्यपदार्थाचा दर्जाही उत्तम ठेवणे आवश्यक आहे. स्टॉल्समधील कर्मचाऱ्यांनी खाद्यपदार्थ बनवताना व ते प्रवाशांना देताना हातात ग्लोव्ह्ज व डोक्यावर टोपी घालणे अनिवार्य आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. प्रवाशांकडून काही वेळा स्वच्छता व दर्जाबाबत तक्रारीही येतात व त्यावर कारवाईदेखील केली जाते,’ अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मात्र, कुर्ला येथील घटनेनंतर मध्य रेल्वे प्रशासनाने स्टॉल्सवरील खाद्यपदार्थाचा दर्जा, तेथील स्वच्छता तपासणीसाठी सात दिवस विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॉलधारक दोषी आढळल्यास दंड किंवा परवाने रद्द केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

दरमहा १०० स्टॉलची तपासणी
सध्या मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांत २४५ खाद्यपदार्थ स्टॉल आहेत. प्रत्येक महिन्याला किमान १०० स्टॉलची तपासणी केली जात असल्याचा रेल्वेचा दावा आहे. यात सरासरी एक टक्क्यापेक्षा कमी स्टॉलमध्ये त्रुटी आढळून येतात, असेही रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. किरकोळ त्रुटी आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाते अन्यथा स्टॉलधारकाचा परवाना रद्द केला जातो, असा दावा या अधिकाऱ्याने केला.

पश्चिम रेल्वेवर सारे आलबेल?
मध्य रेल्वे खाद्यपदार्थ स्टॉलवरील पदार्थाचा दर्जा व स्वच्छता राखण्यात अपयशी होत असतानाच गेल्या तीन वर्षांत एकही स्टॉलधारक दोषी आढळला नसल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे. सर्व स्टॉलधारकांकडून नियम पाळले जात असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने सांगितले. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर सुमारे २०० खाद्यपदार्थ स्टॉल आहेत.