महिला सर्वच क्षेत्रात स्वत:चे स्थान सिद्ध करत असताना काही क्षेत्रात आजही पुरुषांचे वर्चस्व आहे. रेल्वे हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. मात्र रेल्वेत विविध पदांवर पुरुषांबरोबरच महिलाही आपले स्थान निर्माण करताना दिसत आहेत. महिलांच्या या कामाची नोंद घेण्यासाठी येत्या ८ मार्चला महिला दिनाचे औचित्य साधत मध्य रेल्वेने अनोखा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. ‘डेक्कन क्वीन’ ही जागतिक स्तरावर गाजणारी रेल्वे या दिवशी रेल्वेच्या महिला कर्मचाऱ्यांकडून मुंबईहून पुण्याला नेली जाणार आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरण आणि रेल्वेतील त्यांचे स्थान या दोन्ही दृष्टीने ही घटना मैलाचा दगड ठरेल असे म्हणायला हरकत नाही.

८ मार्च रोजी डेक्कन क्वीनमध्ये राधा चलवादी या मुख्य गार्ड म्हणून काम करणार असल्याचे रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनी सांगितले. भारतात सध्या केवळ १२ ते १५ महिला गार्ड कार्यरत असून चलवादी या पुणे विभागातील पहिल्या महिला गार्ड असल्याचेही त्या म्हणाल्या. तर यातील आणखी एक विशेष बाब म्हणजे सुरेखा यादव या लोको पायलट डेक्कन क्वीन चालविण्याचे काम करतील. यादव १९८९ पासून मध्य रेल्वेमध्ये चालक म्हणून कार्यरत असून एकटीने डेक्कन क्वीन चालविण्याचे काम त्या पहिल्यांदाच करणार आहेत. याबरोबरच तिकिट तपासनीस म्हणूनही पुणे स्टेशन विभागातील १५ महिला काम करणार असल्याचे शहा यांनी सांगितले. याशिवाय डेक्कन क्वीनमध्ये असणाऱ्या पुरुष पोलिसांच्या जागीही रेल्वे पोलिस फोर्सच्या (RPF) महिला काम पाहतील.

अशाप्रकारे मध्य रेल्वेमध्ये महिलांनी संचलित केलेली ही दुसऱ्या क्रमांकाची रेल्वे ठरेल. याआधी मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या हार्बर रेल्वे मार्गावर महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी रेल्वे चालवली होती. याबरोबरच मुंबईच्या मध्य रेल्वेतील माटुंगा स्थानकात जुलै २०१७ पासून ४१ महिला स्थानकाची संपूर्ण जबाबदारी संभाळतात. या उपक्रमाची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर येत्या काळात आणखीही काही स्थानके अशाप्रकारे महिलांकडून चालविली जाण्याची शक्यता आहे, असे हर्षा शहा यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना सांगितले. त्यामुळे १८५३ मध्ये सुरु झालेल्या आशिया खंडातील पहिल्या रेल्वे प्रकल्पाला १६ एप्रिल रोजी १६५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने महिलाांचे रेल्वेत निर्माण होणारे स्थान खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे.

 

sayali.patwardhan@loksatta.com