मध्य रेल्वेवर ऑक्टोबर महिन्यात नवे वेळापत्रक

मुंबई : मध्य रेल्वेवर ऑक्टोबर महिन्यात लागू होणाऱ्या नवीन वेळापत्रकात वाढीव उपनगरी रेल्वे फेऱ्यांना स्थान देण्याची शक्यता कमीच आहे. गेल्या तीन वर्षांत ११४ नवीन उपनगरी फेऱ्या प्रवाशांच्या सेवेत आल्यानंतर यंदा फेऱ्यांचा विस्तार, कमी अंतराच्या फेऱ्या रद्द करणे इत्यादीवर भर दिला जाणार असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे हार्बरवरील अंधेरीचा गोरेगावपर्यंत विस्तार केल्यानंतर गोरेगाव ते पनवेल उपनगरी रेल्वे सेवा २०१९ मधील एप्रिल महिन्यात सुरू केली जाणार होती. परंतु या फेऱ्यांसाठीही प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

गेल्या चार वर्षांत मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावर चार लाख प्रवाशांची भर पडली. ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण स्थानकातील प्रवासी संख्येत मोठी भर पडल्याने येथून सीएसएमटीच्या दिशेने प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे रेल्वेमधून पडून मोठय़ा प्रमाणात अपघात होत आहेत. गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी गेल्या तीन वर्षांत ११४ नवीन उपनगरी रेल्वे फेऱ्या सुरू करण्यात आल्या. यात नेरुळ ते खारकोपर मार्गावर २० फेऱ्या सुरू केल्या. त्यानंतर अंधेरीपर्यंत असणाऱ्या हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार केल्यानंतर या मार्गावरील फेऱ्यांतही वाढ झाली. अशा प्रकारे वाढ केल्यानंतर मात्र यंदा उपनगरी फेऱ्यांत वाढ करण्याचे नियोजन नसल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.

ऑक्टोबर २०१९ मध्ये मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर, ठाणे ते पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर उपनगरी गाडय़ांसाठी नवीन वेळापत्रक लागू केले जाणार आहे. त्यावर सध्या काम सुरू आहे. मात्र या वेळी नवीन फेऱ्यांना स्थान देण्याची शक्यता कमी आहे. गेल्या काही वर्षांत वाढवण्यात आलेल्या फेऱ्या पाहता सध्या त्या समाधानकारक असल्याचे सूत्रांनी सांगितले. आणखी फेऱ्या सुरू करण्यासाठी लोकल वेळापत्रकात जागाच नाही.

वाढीव फेऱ्या उपलब्ध करता येऊ शकतात का यावर विचारविनिमय सुरू असल्याचे सांगण्यात आले. वर्षभरात नवीन लांब पल्ल्याच्या गाडय़ाही सुरू केल्या आहेत. यात नुकत्याच सुरू केलेल्या राजधानी एक्स्प्रेसचाही समावेश आहे. लांब पल्ल्याच्या गाडय़ांमुळे उपनगरी रेल्वे फेऱ्यांच्या वेळापत्रकावर काही प्रमाणात परिणामही होत आहे. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक सुरळीत करण्याचा प्रयत्न नवीन वेळापत्रकात असेल, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.

गोरेगाव ते पनवेल रेल्वे सेवेची प्रतीक्षाच

अंधेरी ते गोरेगावपर्यंत हार्बर सेवेचा विस्तार एप्रिल २०१८ मध्ये करण्यात आला. सीएसएमटी ते गोरेगाव लोकल धावल्यानंतर सहा महिन्यांनंतर गोरेगाव ते पनवेल लोकल सुरू करण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेकडून केला जाणार होता. परंतु ही सेवा अद्याप सुरू झालेली नाही. अंधेरी ते पनवेल सेवा आहे. मात्र गोरेगाव ते पनवेल लोकल नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या वेळापत्रकात या सेवेला स्थान मिळण्याचीही शक्यता कमीच आहे.

मध्य रेल्वेवरील प्रवासी संख्या व उपनगरी रेल्वे फेऱ्या

वर्ष                  प्रवासी संख्या    उपनगरी रेल्वे फेऱ्या

२०१६-१७       ४१ लाख ८० हजार      १ हजार ६६०

२०१७-१८       ४२ लाख ३९ हजार      १ हजार ७०६

२०१८-१९       ४४ लाख १५ हजार      १ हजार ७७४