कळवा-मुंब्रा  रेल्वे स्थानकांदरम्यान सोमवारी सायंकाळी रेल्वे रूळांना तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे कामावरुन घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहे. रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून  कल्याणकडे जाणारी वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आली आहे. ठाणे- दिवादरम्यान मध्य मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आली आहे.

या घटनेनंतर स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढताना दिसत आहे. रेल्वे प्रशासनाने धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवल्यामुळे कल्याण, ठाणे येथील प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र कळवा, मुंब्रा या ठिकाणी जलद गाड्या थांबत नसल्याने येथील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळी देखील याच मार्गावर रुळाला तडे गेल्याने काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती.