गाडीतून धूर आल्याने मध्य रेल्वे विस्कळीत
वर्षांतील बारा महिने आपल्या बिघाडांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेवर यंदाचा पहिला बिघाड जुन्या गाडीत झाला आणि मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घाटकोपर स्थानकात एका गाडीच्या डब्यातून धूर आल्यानंतर ही गाडी चांगलीच रखडली. त्यामुळे त्यानंतरच्या गाडय़ा अर्धा ते पाऊण तास दिरंगाईने धावत होत्या. ओव्हरहेड वायरमध्ये ट्रिपिंग झाल्याने ही घटना घडल्याचे स्पष्टीकरण मध्य रेल्वेतर्फे देण्यात आले. मात्र गाडीच्या डब्याचे ब्रेक खराब झाल्याने हा प्रकार घडल्याचेही काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या बिघाडामुळे मध्य रेल्वेवरील ४० फेऱ्या विस्कळीत झाल्या, तर ९ फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
मध्य रेल्वेवर सध्या कालमर्यादा उलटलेले १४५ जुने डबे धावत आहेत. त्यातील रेट्रो फिटेड गाडय़ा तर मध्य रेल्वेवरील सापळे असल्याचे रेल्वेतील कर्मचारीच सांगतात. काही दिवसांपूर्वी यापैकीच एका गाडीच्या ब्रेकमध्ये बिघाड होऊन धूर आल्याने हार्बर मार्गावर गोंधळ उडाला होता. मंगळवारी मुंबईकडे जाणारी एक जुनी गाडी घाटकोपरजवळ आल्यानंतर त्यातील एका डब्यातून धूर येऊ लागला. तब्बल अध्र्या तासापेक्षा जास्त काळ ही गाडी घाटकोपर स्थानकातच खोळंबली होती. मध्य रेल्वेच्या म्हणण्याप्रमाणे ओव्हरहेड वायरमध्ये ट्रिपिंग झाल्यामुळे हा धूर आला आणि गाडी खोळंबली. मात्र काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे जुनाट गाडीच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने धूर आला. याबाबत मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.