मध्य रेल्वेमार्गावर पारसिक बोगद्याजवळ मालगाडीच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्याने या मार्गावरील उपनगरीय सेवा विस्कळीत झाली. सकाळी साडेसात ते आठ या अर्धा तासात मुंबईच्या दिशेकडील जलद मार्ग पूर्णपणे बंद होता. या दरम्यान या मार्गावरील सेवा दिवा ते ठाणे या दरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात आली. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या बिघाडामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.
मध्य रेल्वे मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी मालगाडय़ांची वाहतूक केली जात नाही. तरीही शुक्रवारी या मार्गावर सकाळी साडेसातच्या दरम्यान मुंबईच्या दिशेने एक मालगाडी येत होती. ही मालगाडी पारसिक बोगद्यातून बाहेर आल्यानंतर या मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाला. परिणामी, ही मालगाडी एकाच जागी थांबून राहिली. या गाडीमागून येणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय जलद गाडय़ांचा खोळंबा झाला.
या बिघाडानंतर मुंबईकडे येणाऱ्या सर्व जलद गाडय़ा दिवा ते ठाणे या स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या. त्याचा फटका अप मार्गाच्या वाहतुकीसह डाउन मार्गावरही बसला. अखेर अध्र्या तासानंतर हा बिघाड दुरुस्त करून गाडी मुंबईकडे रवाना झाली. मात्र तोपर्यंत उपनगरीय रेल्वेसेवेचे वेळापत्रक पुरते कोलमडले होते. या बिघाडाचा फटका शुक्रवारी दुपापर्यंत जाणवत होता.