मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी उपनगरीय वाहतूक कोलमडली. त्यामुळे घरी परतणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. या गर्दीत भांडूप-मुलुंड दरम्यान एक मुलगा खाली पडल्याची घटना घडल्याचे समजते.
माटुंगा स्थानकाजवळ अप स्लो मार्गावर संध्याकाळी ७.५० वाजता ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे या मार्गावरील विद्युतपुरवठा खंडीत  झाला. परिणामी या मार्गावरील गाडय़ा थांबून राहिल्या. त्यामुळे स्लो मार्गावरील गाडय़ा विद्याविहार  ते भायखळा दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात आल्या. त्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या गाडय़ा उशिराने धावत होत्या.
परिणामी ठाण्याकडे जाणाऱ्या गाडय़ाही अर्धा ते पाऊण तास विलंबाने धावत होत्या. या घोळामुळे सर्वच स्थानकांवर आणि गाडयांमध्येही प्रवाशांची गर्दी उसळली होती. त्यातूनच भांडूप- मुलुंड दरम्यान एक मुलगा खाली पडल्याचे समजते.