मालगाडय़ांच्या सेवेतून महिन्याभरात उत्पन्न

मुंबई : टाळेबंदीत केंद्र सरकारच्या बहुतांश विभागाकडून मिळणारा महसूल बंद असताना रेल्वेने मात्र  बऱ्यापैकी कमाई के ली आहे. मध्य रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठय़ासाठी मालगाडी चालवून एका महिन्यात तब्बल ३०८ कोटी रुपये उत्पन्न मिळवले आहे.

देशभरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी रेल्वे मंत्रालयाने मालगाडय़ांचा मोठय़ा प्रमाणात वापर सुरू के ला आहे. याबरोबरच पार्सल ट्रेनही सोडल्या आहेत. कोळसा, पेट्रोल, डिझेल, दूध, भाज्या, फळ व अन्नधान्याचा पुरवठा करतानाच औषधांचीही वाहतूक के ली.

मुंबई, नागपूर, भुसावळ, पुणे, सोलापूरमधून २४ मार्च ते २४ एप्रिल या एका महिन्यात १ हजार ४१५ मालगाडय़ांच्या ७० हजार ३७४ डब्यांतून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा के ला. यामुळे ३०८ कोटी ७४ लाख रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

मालगाडय़ांच्या २५२ डब्यातून अन्नधान्य, ४८४ डब्यातून साखर, ३४ हजार ४९७ डब्यातून कोळसा, ६३५ डब्यातून स्टील अशा विविध जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेनेही एका महिन्यात २ हजार २७३ मालगाडय़ा चालवून चांगलेच उत्पन्न मिळवल्याचे सांगण्यात आले. पश्चिम रेल्वेकडूनही १९ विशेष पार्सल ट्रेन चालवून ५ कोटी रुपये कमाई के ली आहे. मात्र मालगाडीतून सर्वाधिक कमाई झाली.