X

मध्य रेल्वेवर ५९ पादचारी पूल कोंडीचे!

प्रवासीसंख्येनुसार रुंदी वाढवण्याचा निर्णय

तीन मीटरपेक्षा कमी रुंदीमुळे प्रवाशांची चेंगराचेंगरी; प्रवासीसंख्येनुसार रुंदी वाढवण्याचा निर्णय

एल्फिन्स्टन रोड येथील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर मुंबई, ठाणे आणि आसपासच्या शहरांतील मध्य रेल्वेच्या स्थानकांची पाहणी करणाऱ्या समितीला एकूण ५९ पूल हे तीन मीटरपेक्षाही कमी रुंदीचे असल्याचे आढळले आहेत. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची मोठी कोंडी होते व प्रसंगी चेंगराचेंगरी होते, असे आढळून आल्याचे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

परळ- एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांना नाहक प्राण गमवावे लागले होते. अरुंद पुलामुळे बहुतेक ठिकाणी तसाच अपघात होण्याची शक्यता असल्याने खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने पुलांची डागडुजी, विस्तारीकरण तसेच नवे पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या एका पाहणीतून मध्य रेल्वेवर तब्बल पन्नासहून अधिक पुलांवर मृत्यूचे सापळे असल्याचे आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली.  मुंबईतील ३७ तर ठाण्यापुढील विविध रेल्वे स्थानकांमधील २२ पुलांची रुंदी ही तीन मीटरपेक्षाही कमी आहे. विशेष म्हणजे, मुलुंड, बदलापूर, अंबरनाथ, कोपर, गोवंडी, आंबिवली, उल्हासनगर या स्थानकांची प्रवासीसंख्या ही लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे या स्थानकांतील पुलांची रुंदी प्राधान्याने वाढण्यात येईल, असेही सूत्रांकडून समजले.

३७ मुंबईतील अरुंद पादचारी पूल (तीन मीटरपेक्षा कमी रुंदी)

२२ ठाण्यातील अरुंद पादचारी पूल (तीन मीटरपेक्षा कमी रुंदी)

सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत ७५ रेल्वे स्थानकांची पाहणी सुरू आहे. गर्दीचे प्रमाण अधिक असणाऱ्या स्थानकांमधील पुलांची रुंदी वाढविण्यात येणार आहे.

– ए.के.सिंह, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

First Published on: October 7, 2017 3:54 am
Outbrain