कुर्ला आणि माटुंगा या स्थानकांदरम्यान ठाण्याकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली. संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास झालेल्या या बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू होती. हा बिघाड आठच्या सुमारास दुरुस्त झाला. मात्र तरीही वाहतुकीवर त्याचा परिणाम होता. संध्याकाळी उशिरा घरी परतणाऱ्यांना या बिघाडाचा फटका बसला.
दरम्यान, पश्चिम रेल्वेमार्गावर प्रवाशांमध्ये मारामारी झाल्याने अंधेरीजवळ एका गाडीतील साखळी खेचून ही गाडी थांबवण्यात आली. अपंगांसाठी राखीव असलेल्या डब्यात एक प्रवासी चढल्याने अपंग प्रवासी व त्या प्रवाशात बाचाबाची झाली. या भांडणाचे पर्यवसन मारामारीत झाले. त्यामुळे इतर प्रवाशांनी साखळी खेचून गाडी अंधेरी स्थानकात १० मिनिटांपेक्षा जास्त काळ थांबवून ठेवली होती. त्याचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या डाउन धीम्या वाहतुकीवर झाला.