हेरिटेज सप्ताह साजरा करणाऱ्या मध्य रेल्वेचे इतिहासाच्या खुणांकडे दुर्लक्ष; वाफेवर चालणारी क्रेन, दोन जुने प्लॅटफॉर्म वाऱ्यावर

देशातील पहिली रेल्वे धावण्याचा मान असलेल्या मध्य रेल्वेवर सध्या हेरिटेज सप्ताहाच्या निमित्ताने मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या पुरातन वास्तूचा सांगोपांग आढावा घेणारे विविध कार्यक्रम मध्य रेल्वेने आयोजित केले आहेत. मात्र मध्य रेल्वेच्या इतिहासाच्या दोन खुणा आजही याच पुरातन इमारतीच्या जवळ दुर्लक्षित अवस्थेत पडून आहेत. ब्रिटिशांच्या काळात मालवाहतुकीसाठी उभारलेले दोन प्लॅटफॉर्म आणि वाफेवर चालणारी क्रेन, अशा या दोन खुणा अनुक्रमे झोपडय़ा आणि गंज लागलेल्या अवस्थेत पडल्या आहेत. हेरिटेज सप्ताह साजरा करणाऱ्या मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे या गतवैभवाला झळाळी देण्यासाठी कोणत्या योजना आहेत, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

china sinking
न्यूयॉर्क आणि टोकियोनंतर चीनमधील शहरेही जलमय; जगातील ‘ही’ शहरे पाण्याखाली जाण्याचे कारण काय?
Russian missile attack kills 13 in Ukraine
रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधील १३ जण ठार
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
soil dumping in Pavana
पवना, इंद्रायणी, मुळा नदीच्या पात्रात राडारोडा, महापालिकेकडून दंडात्मक कारवाई

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म क्रमांक १८च्या पूर्वेकडे बरीच मोकळी जागा आहे. पी. डिमेलो मार्गावरून या जागेत येण्यासाठी केलेल्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच एक भलीमोठी क्रेन गंजलेल्या अवस्थेत पडून आहे. या क्रेनचे वैशिष्टय़ म्हणजे ती वाफेवर चालणारी क्रेन आहे. ब्रिटिश काळात पी. डिमेलो मार्गाच्या बाजूला असलेल्या बंदरावरून येणारे सामान रेल्वेगाडीतून थेट तत्कालीन बोरीबंदर स्थानकापर्यंत येत असे. त्या वेळी एका गाडीतील सामान दुसऱ्या गाडीत किंवा ट्रकमध्ये भरण्यासाठी या क्रेनचा वापर होत होता.

एकेकाळी ही क्रेन ३६० अंशांमध्ये फिरू शकत होती. सध्या मात्र ही क्रेन एका चौथऱ्यावर पडून आहे. या भागातील गर्दुल्ले आणि समाजकंटकांचा वावर लक्षात घेता या गतवैभवासाठी ही बाब धोकादायक आहे.

या प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या बाजूला पत्र्याची एक शेड आहे. या शेडमध्ये प्रवेश केल्यावर लोखंडाचे ओतीव खांब, फरसबंद चौथरे आणि दोन चौथऱ्यांच्या मध्ये दोन रूळ दिसतात. हे मालवाहतुकीसाठी ब्रिटिशांनी उभारलेला बोरीबंदरचे दोन प्लॅटफॉर्म आहेत. एका बाजूला ट्रकचा मागचा भाग प्लॅटफॉर्मच्या चौथऱ्याला लागेल असे कापलेले चौकोन, त्याच्या बाजूलाच सामानाचे वजन करण्यासाठी वजनकाटे, भलेमोठे लाकडी दरवाजे अशा गतवैभवाच्या खुणा आजही येथे दिसतात.

वाफेवर धावलेल्या पहिल्या इंजिनाची प्रतिकृती या स्थानकात ठेवून तेथे एखादे वस्तुसंग्रहालय केल्यास हे उत्तम पर्यटन स्थळ बनू शकते. सध्या मात्र या ऐतिहासिक प्लॅटफॉर्मवर झोपडय़ा असून रुळांवर प्लॅस्टिक पिशव्यांचा खच पडला आहे. मध्य रेल्वे ही जागा हॉटेल उभारणीसाठी देणार असल्याचे समजते. त्यामुळे हा वारसा काळाच्या उदराआड जाणार आहे.

व्याख्यानात दंग

या दोन्ही ऐतिहासिक वस्तू टिकवण्यासाठी मध्य रेल्वेने प्रयत्न करणे आवश्यक असताना मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व जण हेरिटेज सप्ताहानिमित्तची व्याख्याने ऐकण्यात दंग आहेत. याबाबत मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक ए. के. श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही.