रेल्वेमार्गावर होणारे मोठे अपघात आणि त्या अपघातस्थळी जखमींना वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी येणाऱ्या अडचणी यांचा विचार करून मध्य रेल्वेने एक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. अपघातस्थळी वैद्यकीय मदतीची प्रतीक्षा करणाऱ्या जखमींना तातडीने हेलिकॉप्टरद्वारे उचलून मुंबईतील उत्तम रुग्णालयांमध्ये दाखल करण्यासाठी मध्य रेल्वे भायखळा येथे हेलिपॅड उभारण्याच्या विचारात आहे. हे हेलिपॅड तयार झाल्यास हवाई रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना तातडीने भायखळा येथील रेल्वे रुग्णालयाबरोबरच जे. जे., नायर, अशा जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करणे शक्य होईल. गणेशोत्सवाच्या मुहुर्तावरच मध्य रेल्वेने आपल्या या ‘विघ्नहर’ योजनेचा ‘श्रीगणेशा’ केला आहे.
दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातात २३ जण मृत्युमुखी आणि सुमारे शंभर प्रवासी जखमी झाल्यानंतर अपघातस्थळी जखमींना तातडीने वैद्यकीय मदत कशी पुरवता येईल, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानंतर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी या हवाई रुग्णवाहिकेबाबत विचार मांडला होता. त्यासाठी मध्य रेल्वेला राज्य सरकारच्या सहकार्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आता भायखळा येथे मध्य रेल्वे पहिलेवहिले हेलिपॅड उभारण्याच्या विचारात आहे. त्यासाठी मध्य रेल्वेने राज्य सरकारला पत्र लिहून सहकार्याची विनंतीही केली आहे. या योजनेअंतर्गत मध्य रेल्वेवरील सात महत्त्वाच्या ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. या सातही स्थानकांजवळ हेलिपॅड बांधून तेथे राज्य सरकारतर्फे पुरवण्यात आलेल्या रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे अपघाताच्या वेळी या सातही ठिकाणी हवाई रुग्णवाहिकेद्वारे रुग्णांना पोहोचवले जाईल आणि तेथून रुग्णवाहिकांमधून जवळच्या रुग्णालयांत उपचारासाठी दाखल केले जाईल.