लोकलसेवा कोलमडण्याचे खापर मात्र पावसावर

मुंबई : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा कोलमडून पडली आहे. पावसाळय़ापूर्वी विविध कामे उरकल्याचा दावा करून पावसाळय़ासाठी सज्ज असलेल्या मध्य रेल्वे मार्गावर दरवर्षीसारखीच पूरसदृश स्थिती दिसून येत आहे. प्रत्यक्षात मध्य रेल्वेची अर्धवट राहिलेली कामेच या परिस्थितीला जबाबदार असल्याचे दिसून येत आहे.

पावसाळा सुरू होण्याआधी मध्य व पश्चिम रेल्वेकडून उपनगरीय रेल्वे मार्गावर नालेसफाई, झाडांच्या फांद्यांची छाटणी, सिग्नलसह अन्य तांत्रिक दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतात. दरवर्षी मस्जिद, सॅन्डहर्स्ट रोड, भायखळा, शीव, कुर्ला, विद्याविहार, कांजुरमार्ग, मानखुर्द येथे मोठय़ा प्रमाणात पाणी तुंबते. यंदाही येथे पाणी साचू नये यासाठी रुळांची उंची वाढवण्याबरोबरच नालेसफाई केल्याचा दावा केला होता. परंतु काही दिवसांपूर्वी कांजुरमार्ग येथे मोठय़ा प्रमाणावर पाणी तुंबले. खासगी विकासकाने नाल्यावर भराव टाकल्याने पाणी तुंबल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली व पालिकेवर सर्व जबाबदारी सोपविली. सोमवारी झालेल्या पावसात मात्र शीव ते कुर्ला, मानखुर्द येथे रुळांवर पाणी साचले व लोकल गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडण्यास हे प्रमुख कारण ठरले. हार्बरवरील गोवंडी ते मानखुर्द दरम्यानही रुळांची उंची वाढवण्यात आली होती. त्याचादेखील काहीएक फायदा झाला नाही व रूळ पाण्याखाली गेले. कुर्ला येथे तर रुळावर पाणी साचत होते, त्यामुळे मध्य रेल्वेच्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल झाली. तांत्रिक बिघाड होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केल्याचेही वारंवार सांगणाऱ्या मध्य रेल्वेवर सोमवारी शीव, दादर, जुईनगरसह अन्य काही स्थानकांजवळ सिग्नल बिघाडांच्या घटना घडल्या. परिणामी मध्य रेल्वेवरील मुख्य मार्ग व हार्बरवरील लोकल वेळापत्रक विस्कळीत होण्यासाठी ही दोन प्रमुख कारणे ठरली.

चर्चगेट स्थानकाबाहेरील महात्मा गांधीजींच्या भित्तीचित्रातील काही भाग पडून झालेल्या दुर्घटनेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी चर्चगेट स्थानक इमारत व हद्दीतील सुरक्षा कामांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. परंतु अन्य स्थानकांत सुरू असलेल्या कामांमुळेही प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवू शकेल, असा प्रश्न न पडलेल्या पश्चिम रेल्वेला सोमवारी मोठा फटका बसला. मरिन लाइन्स स्थानक इमारतीच्या कामांतील बांबू व संरक्षक जाळी ओव्हरहेड वायरवर पडली. त्यामुळे चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल दरम्यानची धीम्या मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली होती.

 प्रवाशांना फटका

रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या सूचनेनंतर पावसाळ्यात मध्य आणि पश्चिम रेल्वेवर नवीन पादचारी पुलांची कामे थांबवण्यात आली आहेत. परंतु या कामांसाठी असलेले अवजड  सामान हे फलाटांवरच पडून आहे. त्यातच बहुतांश स्थानकात छप्परची कामे अर्धवटच करण्यात आल्याने प्रवाशांना भर पावसात उभे राहून लोकलची वाट पाहावी लागत आहे.

पश्चिम रेल्वेची कामे सुरूच

चर्चगेट ते विरार दरम्यान ५३ नाले असून यातील ३७ नाल्यांची सफाई करण्यात आली असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने मे २०१९ मध्ये दिली होती. तर १६ नाल्यांची सफाई कामे बाकी असून २५ मे पर्यंत ती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. जून व ऑगस्ट २०१९ पर्यंत दुसऱ्या टप्प्यात नालेसफाईची कामे पूर्ण केली जातील, असे पश्चिम रेल्वेने सांगितल्याने  या मार्गावरील कामे अर्धवट असल्याचे स्पष्ट होते.