ठाणे दिवा दरम्यान लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे मुंबईहून घरी जाणाऱ्या सगळ्यांनाच नाहक त्रास सहन करावा लागतोय. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेची रखडपट्टी सुरुच आहे. अशात आता आज पुन्हा एकदा म.रे.मुळे लोकांचा खोळंबा झाला आहे.

आज दुपारी चार ते सव्वाचारच्या दरम्यान ठाणे-दिवा स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ठाणे-दिवा अप आणि डाऊन लोकल सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. दुपारची वेळ असल्याने लोकलमध्ये फार गर्दी नव्हती. मात्र लोकलसेवा ठप्प झाल्याने मुंबईच्या दिशेने आणि कर्जत आणि कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या मुंबईकरांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो आहे.

आज सकाळी कोणतंही कारण नसताना मध्य रेल्वे २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होती. आता आज ठाणे दिवा दरम्यानची लोकलसेवा ठप्प झाली आहे. चाळीस मिनिटांपूर्वी स्लो ट्रॅक सुरु झाला आहे. मात्र लोकलसेवेचं टाइमटेबल मात्र कोलमडून पडलं आहे. मध्य रेल्वेला कोणत्या कारणाने उशीर होईल? आज काय घडलं असेल? आज कोणत्या कारणामुळे लोकल येणार नाही हे सांगता येणं आता कठीण होऊन बसलं आहे. रोज म.रे. त्याला कोण रडे ? हे म्हणायचाही आता मुंबईकरांना कंटाळा आला आहे.