तांत्रिक बिघाड पाचवीला पुजलेल्या मध्य रेल्वेची वाहतूक आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेमार्गावरील मुलुंड स्थानकाजवळ ठाण्याहून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा प्रकार घडला. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या धीम्या मार्गावरील वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला आहे. त्यामुळे सध्या मध्य रेल्वेच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. ऐन गर्दीच्या वेळेत हा प्रकार घडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काल दुरूस्तीसाठी मेगाब्लॉक असूनही आठवड्याच्या पहिल्याच दिवशी त्रास सहन करावा लागल्याने प्रवाशी चांगलेच वैतागले आहेत. मध्य रेल्वेवर रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने वाहतूक विस्कळीत होत असते. रोज तांत्रिक बिघाड होत असेल तर मग मेगा ब्लॉक घेऊन नेमके काय काम केले जाते असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत. सध्या मध्य रेल्वेच्या स्थानकांवर दुरूस्तीचे काम सुरू असल्याची उद्घोषणा करण्यात येत आहे. मात्र, यासाठी नेमका किती वेळ लागेल, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. गेल्या आठवड्यातही ऐन गर्दीच्या वेळी दोनवेळा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर अपघातांचे प्रमाण खूपच वाढल्याचे दिसत आहेत. मे महिन्यातील पहिल्या सहा दिवसांत रेल्वे अपघातात ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या सहा दिवसांत अनुक्रमे १०, १२, ९, १२, ३ आणि शनिवारी सर्वाधिक १८ व्यक्तींचा रेल्वे अपघातात बळी गेला आहे.