६ डबे सेवेतून बाद, तांत्रिक नुकसानही; एक्स्प्रेस व लोकल फेऱ्या रद्द झाल्याचा परिणाम

आसनगाव स्थानकाजवळ नागपूर-मुंबई दुरोन्तो ट्रेनचे इंजिनासह नऊ डबे घरल्याची घटना २९ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मध्य रेल्वेला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. ट्रेनचे वापरात न येणारे इंजिन, डबे यासह काही तांत्रिक नुकसान झाल्याने मध्य रेल्वेला जवळपास ४० कोटी रुपयांपर्यंत फटका सहन करावा लागणार असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

२९ ऑगस्ट रोजी मुंबई आणि परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या काही स्थानकातील रूळ ही पाण्याखाली गेली. तत्पूर्वी याच दिवशी पहाटेच्या सुमारास आसनागाव ते वाशिंददरम्यान अचानक भूस्खलन होऊन बाजूलाच रुळावर माती आणि दगड आले. हे पाहताच नागपूर-मुंबई दुरोन्तो ट्रेनच्या लोको पायलटने त्वरित आपात्कालीन ब्रेक लावला आणि त्यामुळे इंजिनासहित नऊ डबे रुळारून घसरले. डबे घसरताच रूळ उखडले गेले. तर मोठय़ा प्रमाणात ओव्हरहेड वायर, सिग्नलच्या खांबांचेही नुकसान झाले. या घटनेनंतर मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या ट्रेन आणि लोकल सेवांवरही परिणाम झाला.

मध्य रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या तब्बल १६३ ट्रेन रद्द करण्यात आल्या. तर टिटवाळा ते कसारा हा मार्ग बंद ठेवतानाच सीएसएमटीपर्यंतही धावणाऱ्या अनेक लोकल रद्द केल्या. एकंदरीतच मध्य रेल्वेला याचा मोठा आर्थिक फटका बसला.

यासंदर्भात रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रुळावरून घसरलेल्या नऊ डब्यांपैकी सहा डब्यांचे पूर्णत: नुकसान झाले असून ते वापरात येणार नाहीत. तर इंजिनालाही नुकसान झाल्याने ते जवळपास सेवेतून बादच झाले आहे. याचबरोबर रूळ, ओव्हरहेड वायर आणि सिग्नलचा खांबही तुटल्याने त्यांचीही डागडुजी करण्यात आली. एकंदरीतच रेल्वेला झालेले नुकसान हे ४० कोटी रुपये किंवा त्याहीपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले. एक इंजिन साधारण ५ ते १० कोटी रुपयांना येते. तर एक एसी डबा बनवण्याचा खर्चही कोटींच्या घरात असतो.