मुंबईकरांचे आयुष्य जसं घड्याळाभोवती गुंफलं आहे. त्याचबरोबर ते पूर्णपणे रेल्वेवर अवलंबून आहे. मुंबईतील रेल्वेसेवा किंचित जरी कोलमडली, तरी हजारो प्रवाशांवर त्याचा परिणाम होतो. मध्य आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही मार्गांवरून लाखो प्रवासी रोज प्रवास करतात. पण या मार्गांवरील रेल्वे स्थानके स्वच्छ आहेत का, हा प्रश्न विचारला तर अनेकांचे उत्तर नकारार्थीच येईल. अर्थात रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातही यावरच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस या लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणाऱ्या रेल्वे स्थानकांवरही अपेक्षित स्वच्छता राखली जात नाही. देशातील स्वच्छ स्थानकांच्या क्रमवारीत या स्थानकांची घसरण झाली. त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या उपाययोजना आखण्याचा सध्या रेल्वे विभागाकडून विचार केला जात आहे.

रेल्वेमध्ये किंवा रेल्वे स्थानकांवर अस्वच्छता करणाऱ्यांवर किंवा थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार सध्याच्या नियमांप्रमाणे केवळ स्टेशनमास्तर किंवा ट्रेन टिकिट एक्झामिनर (टीटीई) यांनाच आहे. आता या अधिकारांचे विकेंद्रीकरण करून स्थानकांवर स्वच्छता निरीक्षक आणण्याचा विचार रेल्वेकडून केला जात आहे. हे निरीक्षक स्थानकांवरील स्वच्छतेकडे लक्ष ठेवतील आणि अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करतील, असा प्रस्ताव तयार केला जात आहे. यासाठी रेल्वेच्या नियमावलीमध्ये बदल करावे लागणार आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या माहितीमध्ये मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रविंद्र गोयल म्हणाले, नियमांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी आम्ही रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर स्वच्छता निरीक्षकही अस्वच्छता करणाऱ्यांवर किंवा स्थानकांवर थुंकणाऱ्यांवर कारवाई करू शकतील.

देशभरातील रेल्वेस्थानकांच्या स्वच्छतेची पाहणी करण्याचे काम रेल्वे मंत्रालयाने एका खासगी संस्थेला दिले होते. त्याखेरीज या स्थानकांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नोंदवलेली मते आणि प्रत्यक्ष पाहणी अशा तीन माध्यमांतून एक हजार गुणांपैकी मिळालेल्या गुणांनुसार स्थानकांची क्रमवारी निश्चित करण्यात आली. या यादीमध्ये पुणे स्थानक देशभरात ९व्या क्रमांकावर आहे. तर मुंबई आणि लगतची अनेक स्थानकांची यादीमध्ये घसरण झाली आहे. ठाणे ३२६व्या तर कल्याण ३०२व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यावर विचार करण्यात येतो आहे.