आवश्यक असेल तरच लोकल प्रवास करण्याचे रेल्वेचे आवाहन

कल्याणचा सर्वात जुना पत्रीपूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेवर रविवारी सहा तासांच विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी डोंबिवली ते कल्याणदरम्यानच्या लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय १४० लोकल फेऱ्या रद्द  केल्या आहेत. काही मेल-एक्स्प्रेस गाडय़ांचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे. गरज असेल तरच प्रवास करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.

रविवारी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक संपताच लोकल सेवा पूर्ववत होतील. ब्लॉक सुरू होण्यापूर्वी सीएसएमटीहून कर्जतसाठी सकाळी ८.१६ वाजता आणि कल्याणहून सीएसएमटीसाठी शेवटची जलद लोकल सकाळी ९.०९ वाजता सोडण्यात येणार आहे. सीएसएमटी ते डोंबिवली आणि कल्याण ते कर्जत, कसारादरम्यान लोकल गाडय़ा नियमितपणे धावतील. त्याशिवाय काही विशेष लोकल फेऱ्याही सोडण्यात येणार आहेत.

मेल-एक्स्प्रेस गाडय़ांपैकी मनमाड एक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेस, मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, जालना जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय अन्य मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या वेळा आणि शेवटचे थांबेही बदलले केले आहेत.

कल्याण-डोंबिवली प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी तेथील महापालिकेशी बोलून जादा बसगाडय़ा सोडण्याची विनंती मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवरही चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रलदरम्यान सकाळी १०.३५ पासून पाच तासांसाठी ब्लॉक घेऊन विविध कामे केली जातील. हा ब्लॉक अप व डाऊन जलद मार्गावर असेल.