वर्षभरात ८३ लाख तर दिवसाला २५ हजार प्रवासी कमी; मेट्रो, पूर्व मुक्तमार्ग यांचा परिणाम
प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायक प्रवासासाठी विविध प्रकल्प हाती घेणाऱ्या मध्य रेल्वेच्या उपनगरीय प्रवासी संख्येत गेल्या वर्षभरात कमालीची घट झाली आहे. विशेष म्हणजे खूप वर्षांनी मध्य रेल्वेची प्रवासी संख्या घटली आहे. घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्ग आणि पूर्व मुक्तमार्ग या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे ही घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. उपनगरीय प्रवाशांच्या संख्येतील ही घट वर्षभरात ८२.७० लाख प्रवासी एवढी आहे. म्हणजेच दिवसाला तब्बल २५ हजार प्रवासी घटले आहेत. मध्य रेल्वेवरील प्रवासी संख्येच्या तुलनेत २५ हजार ही खूपच छोटी संख्या असली, तरी शहरातील इतर प्रकल्प मार्गी लागल्यावर उपनगरीय सेवेवरील भार आणखी कमी होणार आहे.
मुंबईच्या उपनगरीय रेल्वेसेवेवर प्रचंड ताण असून पश्चिम आणि मध्य रेल्वेवर दिवसभरात तब्बल ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करतात. त्यात मध्य रेल्वेवरील प्रवाशांची संख्या ४३ लाखांच्या आसपास आहे. एवढय़ा प्रचंड प्रवासी संख्येला सेवा देण्यासाठी मध्य रेल्वे १४३ गाडय़ांमार्फत दिवसभरात १६८०पेक्षा जास्त सेवा चालवते. परिणामी गाडय़ांना भरपूर गर्दी असल्याचेही आढळते. ही गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे सध्या हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ांसारखे विविध उपाय करत आहे. पण हाती आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात उपनगरीय प्रवाशांची संख्या मध्य रेल्वेवर कमी झाली आहे.

‘मरे’वरील प्रवासी संख्येचे गणित..
* २०१४-१५ या वर्षांत मध्य रेल्वेवर उपनगरीय प्रवाशांची संख्या १४७८.१४ दशलक्ष एवढी होती
* २०१५-१६ या वर्षांत १५३१.५४ दशलक्ष एवढी वाढेल, असा अंदाज होता
* प्रत्यक्षात २०१५-१६ या वर्षांत १४६९.८७ दशलक्ष एवढे उपनगरीय प्रवासी मध्य रेल्वेवर नोंदवले गेले
* म्हणजेच या प्रवासी संख्येत ८.२७ दशलक्ष म्हणजेच ८२.७० लाखांनी घट झाली आहे. ही संख्या दर दिवशी तब्बल २५ हजारांच्या आसपास येते

गेल्या पाच वर्षांत रेल्वेची प्रवासी संख्या कमी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामागे अंधेरी-घाटकोपर यांदरम्यान सुरू झालेला मेट्रोमार्ग, सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता, पूर्व मुक्तमार्ग आदी अनेक प्रकल्पांचा हातभार आहे. या प्रकल्पांमुळे घाटकोपरहून अंधेरी वा पश्चिम उपनगरांत जाणाऱ्या प्रवाशांना वेगवान साधन मिळाले. त्याचा परिणाम मध्य रेल्वेच्या प्रवासी संख्येवर झाला.
– नरेंद्र पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी (मध्य रेल्वे)
हार्बरचा ‘परिवर्तन’ गोंधळ
मुंबई : छत्रपती शिवाजी टर्मिनसहून पनवेलला जाणाऱ्या रेल्वे गाडीत शुक्रवारी मशीद बंदर स्थानकादरम्यान बिघाड झाल्याने अप आणि डाऊन मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला. यात कार्यालये सुटण्याची वेळ असल्याने स्थानकांवर तसेच रेल्वे गाडीच्या डब्यात प्रवाशांची गर्दी उसळली होती. हा गोंधळ तब्बल तासभर सुरू असल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी टर्मिनसहून पनवेलला जाणाऱ्या रेल्वे गाडीत मशीद बंदर स्थानक येताच तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे त्या मागोमाग येणाऱ्या लोकलच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे अर्धा तास वाहतूक बंद पडल्याने दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सायंकाळी ६.४५ वाजता लोकल सेवा सुरू करण्यात रेल्वे प्रशासानाला यश आले.