ठाणे, ऐरोली, सीएसएमटी स्थानकांतील प्रवाशांकडून सर्वाधिक वापर

रेल्वे स्थानकांतील तिकीट खिडक्यांसमोर लागणाऱ्या लांब रांगा कमी करण्यासाठी रेल्वेने सुरू केलेल्या मोबाइल यूटीएस अ‍ॅपला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून दररोज ७५ हजारांपेक्षा अधिक तिकिटे मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकांतून काढली जात आहेत. यामध्ये सर्वाधिक तिकिटे ठाणे स्थानकातून काढली जात असून त्याखालोखाल ऐरोली, सीएसएमटी आणि कल्याण या स्थानकांत मोबाइल तिकिटांचा अधिक वापर केला जात आहे.

उपनगरीय प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडक्या, एटीव्हीएम तसेच जनसाधारण तिकीट सेवक उपलब्ध आहेत. त्याहीपेक्षा प्रवाशांना झटपट तिकीट उपलब्ध व्हावे यासाठी मोबाइल तिकीट अ‍ॅपची सुविधा साधारण तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. या अ‍ॅपवर कागदविरहित किंवा एटीव्हीएमद्वारे छापील तिकीट मिळवण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध आहे. यासाठी रेल्वेची जीपीएस यंत्रणा कार्यरत असणे आवश्यक आहे. रेल्वे हद्दीत ३० मीटर अंतरापर्यंत जीपीएस यंत्रणा कार्यरत असते. त्यातही अनेक अडथळे येत असल्याने तिकीट काढणे वेळखाऊ प्रक्रिया होती.

परंतु रेल्वेने जीपीएसची व्याप्ती वाढवल्याने अ‍ॅपवरील तिकीट सहज मिळू लागले. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत यूटीएस अ‍ॅपचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे.

सध्या दररोज ७५ हजारांपेक्षा जास्त मोबाइल तिकिटे काढली जात असून, यात ठाणे स्थानक आघाडीवर आहे. ठाण्यात तिकीट खिडक्या, जनसाधारण आणि एटीव्हीममधून दररोज काढल्या जाणाऱ्या एकूण ८२ हजार तिकिटांपैकी सरासरी ४,५८७ तिकिटे मोबाइल यूटीएस अ‍ॅपमधून काढली जात असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हे प्रमाण १० टक्के एवढे आहे. त्यापाठोपाठ ऐरोलीत एकूण १५,७२९ तिकिटांपैकी २,१०४ तिकिटे मोबाइल अ‍ॅपमधून काढली जातात. सीएसएमटीतील १,९७० तिकिटे मोबाइल अ‍ॅपमधून काढण्यात येत आहेत.

तांत्रिक अडचणींचाही सामना

मोबाइल अ‍ॅपवर तिकीट काढताना प्रवाशांना तांत्रिक अडचणींचाही सामना करावा लागतो. काही वेळा मोबाइलवर तिकीट काढताना नेटवर्कची समस्या येते आणि त्याचवेळी संपर्क तुटतो. त्यामुळे तिकिटाचे पैसे खात्यातून जातात. मात्र तिकीट उपलब्ध होत नाही. २४ तासांत किंवा तीन ते सात दिवसांत पुन्हा पैसे प्रवाशांच्या खात्यात जमा होतात. याचा प्रवाशांना मनस्ताप होतो.