‘ओव्हरटाइम’ करण्यास नकार; सेवेवर परिणामाची शक्यता

मुंबई : मोटरमनच्या २२९ रिक्त जागा भरा, सिग्नल नियम मोडल्यास मोटरमनला कामावरुन कमी करण्याचा नियम मागे घेण्यात यावा, अशा मागण्या करत मध्य रेल्वेवरील मोटरमनकडून शुक्रवारी ओव्हरटाईम न करता नियमानुसार काम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे लोकल फेऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मध्य रेल्वेकडून रेल्वे संघटनांसोबत उशिरापर्यंत तोडगा काढण्याचेही काम सुरू होते. मात्र तोडगा काही निघाला नाही. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय हा शुक्रवारीच होण्याची शक्यता आहे.

सध्या मध्य रेल्वेवर ६७१ मोटरमन कार्यरत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत वाढलेल्या लोकल फेऱ्या, तुलनेने मोटरमनची कमी असलेली संख्या, त्यातच लाल सिग्नल असल्यास लोकल चालवताना मोटरमनकडून तो नियम नकळत मोडल्यास कामावरुन कमी करण्याचे प्रकार होतात. त्यामुळे मोटरमनने २२९ रिक्त जागा भरतानाच लाल सिग्नल मोडल्यास कामावरुन कमी करण्याचा नियम लागू करु नये, अशी मागणी केली आहे. सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे या मागण्या करतानाच त्याला नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, एससीएसटी यासह अन्य काही रेल्वे कर्मचारी संघटनांनी पाठिंबाही दिला आहे. या मागण्यांसाठी शुक्रवारपासून मोटरमनने ओव्हरटाईम न करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत ओव्हरटाईम करणार नसल्याची भूमिका घेतल्याने लोकल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. हे आंदोलन होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेकडून संघटनांसोबत बैठका घेण्यात येत होत्या. आंदोलन केल्यास कारवाईचा इशाराही रेल्वेकडून देण्यात आला.