मुंबईची जीवनवाहिनी म्हटली जाणारी मध्य रेल्वे प्रवाशांसाठी कायमच विविध सुविधा देत असते. आता यामध्ये आणखी एक भर पडली असून मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या ५ स्थानकांवर नागरिकांना रेल्वे प्रशासनाकडून वैद्यकीय सेवा मिळणार आहे. तीही केवळ १ रुपयात.

येत्या दोन महिन्यांत प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सुरुवातीच्या काळात ही सुविधा कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, वडाळा आणि दादर या पाच स्थानकांवर असणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आणखी १५ ठिकाणी ही सुविधा उपलब्ध होईल, असेही रेल्वेकडून सांगण्यात आले. रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान काहीवेळी अपघात होतात. त्यावर गोल्डन अवरमध्ये उपचार होणे महत्त्वाचे असते. यासाठी हे क्लिनिक अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. याबरोबरच इतर आजारांवरील उपचारासाठीही याठिकाणी २४ तास एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध असणार आहेत. याशिवाय त्वचारोगतज्ज्ञ, मधुमेहतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ हेही ठराविक कालावधीसाठी या दवाखान्यात उपस्थित असणार आहेत असे ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

सार्वजनिक-खासगी भागीदारीतून हा प्रकल्प चालविण्यात येणार आहे. यामध्ये मध्य रेल्वेकडून जागा, पाणी आणि वीज दिली जाणार असून डॉक्टर, वैद्यकीय उपकरणे यासारख्या इतर सुविधा खासगी यंत्रणेकडून पुरविण्यात येणार आहेत.

दवाखान्याबरोबरच याठिकाणी असणाऱ्या वैद्यकीय प्रयोगशाळेत प्रवाशांना कमी खर्चात आरोग्य तपासण्या करता येतील तसेच औषधेही स्वस्तात उपलब्ध होणार आहेत. प्रवासादरम्यान प्रवाशांना काही तातडीच्या उपचारांची गरज भासल्यास या सुविधेचा निश्चितच फायदा होणार आहे. एकूण खासगी क्षेत्रात वैद्यकीय उपचारांचा होणारा खर्च आणि रेल्वेने अशाप्रकारे उपलब्ध करुन दिलेली सुविधा प्रवाशांसाठी लाभदायक ठरणार आहे.