विकासकांची इरादापत्रे मागवली
मुंबई विभागातील सहा स्थानकांसह राज्यातील ३३ स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी मध्य रेल्वेकडून इरादापत्रे मागवण्यात आली आहेत. देशभरातील ए-वन आणि ए या श्रेणीतील ४०० स्थानकांचा पुनर्वकिास करण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अर्थसंकल्पादरम्यान केली होती. मुंबई, पुणे, भुसावळ, सोलापूर आणि नागपूर या मध्य रेल्वेच्या पाच विभागांतील स्थानकांच्या पुनर्वकिासासाठी खासगी कंपन्या तसेच उद्योजकांनी स्वत:चा आराखडा सादर करणे अपेक्षित आहे.
दादर, कल्याण, ठाणे, एलटीटी, पनवेल, लोणावळा या मुंबई विभागातील स्थानकांसह इतर २७ स्थानकांवर प्रवाशांसाठी सेवासुविधा पुरवितानाच खासगी विकासकांना महसूल देणारा आराखडा तयार करण्याची मुभा आहे. रेल्वे मंत्रालयाच्या योजनेप्रमाणे या स्थानकांवर खाद्यपदार्थाची दुकाने तसेच वस्तू विक्रीयोग्य जागा तयार करता येतील. मात्र हा पुनर्वकिास करताना कमीत कमी खर्चात होणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत रेल्वे मंत्रालयाने देशभरातील तब्बल ४०० स्थानकांची निवड केली आहे. ही ४०० स्थानके ए-वन तसेच ए या श्रेणीतील आहेत.
या ४०० पैकी ३३ स्थानके मध्य रेल्वेवर आहेत. या स्थानकांच्या विकासासाठी विकासकांचे इरादापत्र मागवणारी जाहिरात नुकतीच मध्य रेल्वेने प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन प्रत्येक स्थानकाच्या विकासकाबरोबर मध्य रेल्वे नियम व अटी ठरवणार आहे. स्थानकांवरील सोयीसुविधा वाढवण्यासाठी, प्रवाशांना उत्तम स्थानकांचा अनुभव देण्यासाठी ही योजना नक्कीच फायदेशीर आहे. आता इरादापत्रे भरणाऱ्या विकासकांसह चर्चा होऊन त्यातूनच मार्ग काढला जाणार आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

विभाग आणि स्थानके
’मुंबई : दादर, कल्याण, ठाणे, एलटीटी, पनवेल, लोणावळा
’पुणे : पुणे, कोल्हापूर, मिरज
’नागपूर : नागपूर, बल्लारशाह, बेतूल, चंद्रपूर, वर्धा
’भुसावळ : भुसावळ, नाशिक रोड, अकोला, अमरावती, बडनेरा, बुऱ्हाणपूर, चाळीसगाव, जळगाव, खंडवा, मनमाड, शेगाव
’सोलापूर : सोलापूर, अहमदनगर, दौंड, गुलबर्गा, कोपरगाव, कुर्डुवाडी, लातूर, साईनगर शिर्डी.