लक्ष्मी स्वामी यांच्या मुलांची रेल्वेला विनंती

मला रेल्वेकडून पैशांची अपेक्षा नाही, मात्र लोकलमध्ये आगीची घटना घडल्यानंतर रेल्वे पोलिसांनी वृद्ध व महिला यांना इच्छित स्थळी पोहोचविण्याची काळजी घेणे आवश्यक होते, अशी कळकळीची विनंती मंगळवारी खोपोली-सीएसटी लोकलच्या मालडब्यात आग लागल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळात मृत्यू झालेल्या बदलापूर येथील लक्ष्मी स्वामी यांच्या मुलांनी व्यक्त केली.

मंगळवारी सायंकाळी ७.०१ खोपोली-सीएसटी लोकलने मुंबईला निघालेली आई रात्री १२ वाजले तरी घरी आली नव्हती. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या त्यांच्या मुलांनी बदलापूर स्थानक मास्तरांना याबाबत विचारणा केली. बदलापूर स्थानक मास्तरांनी बदलापूरहून ७.०१ ला सुटलेल्या खोपोली-सीएसटी लोकलच्या मालडब्याला विक्रोळी-घाटकोपर दरम्यान आग लागल्याचे सांगितले. त्यानंतर लक्ष्मी स्वामी यांची सुनील व ओम या दोन्ही मुलांनी घाटकोपर स्थानकाकडे धाव घेतली. घाटकोपर स्थानकावरील दोन पोलिसांच्या मदतीने त्यांनी विक्रोळी-घाटकोपर दरम्यान लोकल थांबलेल्या परिसरात तपासणी केली. मात्र तेथेही लक्ष्मी स्वामी न सापडल्याने कदाचित आई लोकलमध्येच झोपली असेल या आशेने ते लोकल थांबलेल्या ठिकाणी गेले.  कळवा येथे थांबलेल्या लोकलचे डबे तपासले तरीही आई सापडली नाही. यामुळे निराश होऊन त्यांनी बदलापूरातील आपले घर गाठले. बुधवारी सकाळी ११ च्या दरम्यान घाटकोपर पोलीस ठाण्यातून लक्ष्मी स्वामी सापडल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सुनील व ओम या दोघांनीही घाटकोपर स्थानक गाठले. तेथे गेल्यावर लक्ष्मी स्वामी यांना राजावाडी रुग्णालयात नेल्याचे सांगण्यात आले. लक्ष्मी यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता आणि त्यातूनच मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातही नमूद करण्यात आले आहे.

मंगळवारी अपघात झाल्यानंतर संपूर्ण रात्र लक्ष्मी स्वामी यांचे शव विक्रोळी व घाटकोपर दरम्यान सहा क्रमांकाच्या रुळाशेजारी पडून होते. लोकलमध्ये आगी लागल्यानतंर निर्माण झालेल्या गोंधळात लक्ष्मी स्वामी गाडीतून उतरल्या असतील आणि रुळावरुन चालताना त्यांना मेलने धडक दिल्याची शक्यता आहे, असे सुनील स्वामी यांनी सांगितले. सहा महिन्यांपूर्वी आजारामुळे त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते आणि आता अचानक आईच्या निधनाने स्वामी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. गुरुवारी सकाळी बदलापूर येथील माजर्ली स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळीही आईच्या मृत्यूची जबाबदारी रेल्वे नाकारत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

घटनेची चौकशी होणार

मंगळवारी खोपोली-सीएसटी लोकलला आग लागल्यानंतर रेल्वे पोलीस बराच वेळ घटनास्थळी पाहणी करीत होते. मात्र तरीही या घटनेची चौकशी करण्यात येईल, असे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे अधिकारी रवींद्र गोयल यांनी सांगितले.